नवीमुंबईत चोरलेल्या 11 दुचाकी यवतमाळ जिल्ह्यातून केल्या जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

चोरट्याला दारव्ह्यात अटक; मुंबई पोलिसांची कारवाई 

पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविल्यानंतर संशयित दत्ता याने ठिकठिकाणी दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने त्याच्याकडून सुमारे तीन लाख 63 हजार रुपये किमतीच्या एकूण 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या.

दारव्हा (जि. यवतमाळ) : नवी मुंबई-वाशी परिसरातून चोरलेल्या 11 दुचाकी तालुक्यातील लाखखिंड येथून जप्त करण्यात आल्या. बुधवारी (ता.28) संध्याकाळी नवीमुंबई-वाशी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत संशयित अनिल रुडे (वय 23, रा. लाखखिंड) यास दारव्हा येथून अटक करण्यात आली. जप्त दुचाकींसह पोलिस संशयिताला मुंबई येथे घेऊन गेले आहेत. 

नवीमुंबई- वाशी येथील दुचाकींची चोरी व चोरट्याचे लाखखिंड कनेक्शनवर नवी मुंबई पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तविली जात आहे. नवी मुंबई-वाशी एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून दुचाकी चोरीच्या जवळजवळ दहापेक्षा अधिक फिर्यादीं दाखल झालेल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपासात मिळालेल्या माहितीनुसार मुंबईचे पोलिस मंगळवारी (ता.27) लाखखिंड येथे पोहोचले. यावेळी त्यांना दहा दुचाकी आढळून आल्या, तर नेर येथे दुरुस्तीसाठी नेलेली एक अशा नऊ लाख रुपयांच्या एकूण 11 महागाड्या दुचाकी जप्त केल्या. तर, बुधवारी (ता.28) पोलिसांनी संशयित अनिल रुडे याला अटक केली. जप्त केलेल्या दुचाकींसह संशयित रुडेला घेऊन पोलिस पथक मुंबईला रवाना झाले. दरम्यान, मुंबईतील दुचाकी चोरीचे कनेक्शन लाखखिंड कसे, याबाबत तालुक्यातून आश्‍चर्य व्यक्त केले जात असून, या गुन्ह्यातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

यवतमाळातून 13 दुचाकी जप्त
यवतमाळ येथील टोळीविरोधी पथकाने शहरातील एका घरफोडीचा तपास करताना दत्ता सुरेश लिंगलवार (वय 30, रा. सदोबा सावळी, सध्या रा. मौजा गंगाजीनगर ता. माहूर जि. नांदेड) याला बुधवारी (ता.28) अटक केली. त्याला पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविल्यानंतर संशयित दत्ता याने ठिकठिकाणी दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने त्याच्याकडून सुमारे तीन लाख 63 हजार रुपये किमतीच्या एकूण 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या.

Web Title: yavatmal news mumbai police seize 11 bikes in darvha