श्रमदानानंतरच जोडप्याचे सात फेरे

सूरज पाटील
शनिवार, 28 एप्रिल 2018

दारव्हा तालुक्यातील मुंढळ हे तीनशे 52 लोकसंख्येचं गाव. गावाला पाणीटंचाईच्या झळा चांगल्याच सोसाव्या लागत आहेत. गावापासून दीड किलोमीटरवर एक विहीर आहे. तेथून पायपीट करीत हंडाभर पाणी आणून तहान भागवावी लागते. यंदा गावाची निवड पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी झाली.

यवतमाळ : वधू मंडपी लग्नाची धामधूम...नवरदेवासह पाहुण्या मंडळीचे मंडपात आगमन...मंत्रोच्चाराला सुरुवात झाली. वेळेवर वधूने केलेल्या ‘आधी श्रमदान, नंतरच लग्न...’ या हट्टामुळे वर्‍हाडी बुचकळ्यात पडले. ही बाब नवरदेवाला कळताच त्याने हातात कुदळ घेऊन भावी पत्नीसह श्रमदान केले. 

दारव्हा तालुक्यातील मुंढळ हे तीनशे 52 लोकसंख्येचं गाव. गावाला पाणीटंचाईच्या झळा चांगल्याच सोसाव्या लागत आहेत. गावापासून दीड किलोमीटरवर एक विहीर आहे. तेथून पायपीट करीत हंडाभर पाणी आणून तहान भागवावी लागते. यंदा गावाची निवड पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी झाली. त्यामुळे ‘एकजुटीने पेटलं रान, तुफान आलं या’, अशी स्थिती आहे. आपले गाव पाणीदार व्हावे,  विहिरी पाण्याने तुडुंब भरून रहाव्या. आजूबाजूचा परिसर हिरवा होईल, या जाणिवेने तरुण, तरुणी, महिला, पुरुष अख्ख्या गावालाच श्रमदानाने झपाटलं. गावातील रेणुराव राऊत यांची मुलगी राखी हिचा विवाह बुधवारी (ता.25) नांदगाव खंडेश्‍वर येथील सुनील मेटे या तरुणाशी ठरला.

लग्नाची वेळ जवळ येताच वर्‍हाडी मंडळींचे मंडपात आगमन झाले. मंत्रोच्चाराला सुरुवात झाली. आधी श्रमदान करू नंतरच लग्न होईल, असा हट्ट राखीने धरला. आधी लग्न होऊ दे, नंतर श्रमदान करता येईल. असे तिला नातेवाइकांनी समजावून सांगितले. मात्र, ती आपल्या निर्णयावर ठाम होती. मंडपात वाढलेली कुजबूज नवरदेवाच्या कानावर आली. त्यानेही मोठ्या मनाने श्रमदानासाठी पुढाकार घेतला. गावापासून काही अंतरावर जाऊन दोघांनीही श्रमदान केले. आपले माहेर पाणीदार होण्यासाठी आपल्यासह भावी पतीचा हातभार लागल्याचे समाधान तिच्या चेहर्‍यावर दिसून आले. मुंढळ येथील एका आदर्शाची चर्चा परिसरात होत आहे.

Web Title: yavatmal social work