क्रिम पोस्टवर वर्षानुवर्षे ठिय्या मांडून बसलेल्या पोलिसांना एसपींचा दणका; शहरातून थेट दुर्गम भागांत बदली 

सूरज पाटील 
Sunday, 21 February 2021

जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या शनिवारी आयोजित बैठकीत एकमताने निर्णय घेऊन तीन पोलिस निरीक्षक, पाच सहायक पोलिस निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक, दहा पोलिस अंमलदारांच्या बदलीवर शिक्कामोर्तब केले.

यवतमाळ : जिल्ह्यात रूजू झाल्यापासून आक्रमकपणा दाखवित गुन्हेगारी वर्तुळात धडकी भरविणारे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी शनिवारी (ता.20) रात्री उशिरा काढलेल्या बदली आदेशातून  निशाना साधला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस ठाण्यांत धक्कातंत्र दिले. तर, क्रिम पोस्टवर वर्षानुवर्षे ठिय्या मांडून असलेल्या पोलिस अंमलदारांची दुर्गम भागात बदली करून दणका दिला.

जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या शनिवारी आयोजित बैठकीत एकमताने निर्णय घेऊन तीन पोलिस निरीक्षक, पाच सहायक पोलिस निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक, दहा पोलिस अंमलदारांच्या बदलीवर शिक्कामोर्तब केले. जिल्ह्यात रूजू झाल्यापासून पोलिस अधीक्षकांनी शिस्तीचा बाणा कायम राखला. त्यांच्या आक्रमकपणामुळे गुन्हेगारांना धडकी भरली आहे. तर, अवैध धंदेही बंद करण्यात बर्‍यापैकी यश आले आहे. कारवाईच्या धस्क्यामुळे पॉकेट संस्कृतीला चाप बसला आहे. त्यातच प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदल्यातून ‘संदेश’च दिला आहे. 

Breaking: अमरावती आणि अचलपूरमध्ये आठवडाभर कडकडीत बंद; जीवनावश्यक बाबी वगळता सर्व...

एलसीबीत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांची बदली यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली. वसंतनगरचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांची एलसीबीत वर्णी लागली. यवतमाळ शहरचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांची वसंतनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. टोळी विरोधी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक गणेश वनारे यांची एलसीबी, यवतमाळ ग्रामीणचे सपोनि गजानन कर्‍हेवाड एलसीबी, अवधूतवाडी ठाण्याचे सपोनि विवेक देशमुख एलसीबी, एलसीबीचे सपोनि विनोद चव्हाण यांची अवधूतवाडी ठाण्यात बदली करण्यात आली. 

आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुलकुमार राऊत यांना नियंत्रण कक्षात बसविण्यात आले आहे. एलसीबीतील पीएसआय सचिन पवार यांची यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. विभागप्रमुखांनी संबंधित अधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्यापूर्वी त्यांच्याकडील प्रलंबित असलेले गुन्हे तपास, अकस्मात मृत्यू, अर्ज चौकशी आदी प्रकरणांची कागदपत्रे केस डायरीसह अन्य अधिकार्‍यांकडे हस्तांतरित करण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले आहे. प्रशासकीय कारणास्तव झालेल्या बदलींमुळे पोलिस वर्तुळात ‘खुशी’पेक्षा ‘गम’चेच चित्र दिसून आले. 

हेही वाचा - कौतुकास्पद! वैद्यकीय सेवा 'त्या' चिमुकल्यासाठी ठरली देवदूत; शर्थीचे प्रयत्न करून वाचवला...

यवतमाळातून थेट दुर्गम भाग

यवतमाळ शहर, स्थानिक गुन्हे शाखा, जिविशा, टोळी विरोधी पथक, एटीसीतील पोलिस अंमलदारांना बदली प्रक्रियेत थेट दुर्गम भागातील पोलिस ठाणे देण्यात आले. रवी आडे (बिटरगाव), गजानन अजमिरे (दराटी), रवींद्र जाधव (पाटण), ऋषी ठाकूर (मुकुटबन), संजय दुबे (खंडाळा), गोपाल वास्टर (राळेगाव), सय्यद साजिद सय्यद हाशम (दराटी), रुपेश पाली (पोफाळी), नितीन खवळे (उमरखेड), निसारउल्ला अब्दुल मन्नान मन्नान खॉ (मारेगाव) यांच्या नावाचा बदली यादीत समावेश आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yavatmal SP suddenly did transfer of police officers