कीटकनाशक बाधितांच्या उपचारासाठी 50 लाखांचा निधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

यवतमाळ - कीटकनाशक फवारणीने बाधा झालेल्या शेतकऱ्यांच्या उपचारासाठी 50 लाखांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

यवतमाळ - कीटकनाशक फवारणीने बाधा झालेल्या शेतकऱ्यांच्या उपचारासाठी 50 लाखांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

कीटकनाशक फवारणीच्या बाधेने जिल्ह्यातील 22 शेतमजूर, शेतकऱ्यांचे बळी गेले. सातशेवर शेतकऱ्यांना बाधा झाली. प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले. राज्य सरकारवर टीका झाली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी (ता. 22) यवतमाळचा दौरा केला. रुग्णालयातील कीटकनाशक बाधितांची विचारपूस करून आढावा घेतला.

कीटकनाशक फवारणीमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिवाळीनंतर मुख्यमंत्री येतील, असा कयास लावला जात होता. त्यानुसार मुख्यमंत्री आज यवतमाळात आले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठले. तेथे कीटकनाशक बाधितांची भेट घेतली. गंभीर रुग्णांच्या प्रकृतीविषयी डॉक्‍टरांना विचारपूस केली. त्यानंतर दहा वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. तेथे त्यांनी अकरापर्यंत प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला.

त्यानंतर फडणवीस यांनी माध्यमाच्या केवळ एका प्रतिनिधीला बोलावून त्याला माहिती दिली. कीटकनाशक बाधितांच्या उपचारासाठी औषधे कमी पडू नयेत म्हणून 50 लाख रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी जिल्हा नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत सांगितले. ते म्हणाले, की कीटकनाशक प्रकरणाचा संपूर्ण आढावा शासनाने घेतला आहे. या संदर्भात राज्य सरकराने पहिल्या दिवसापासून वेगात कार्यवाही केली. या ठिकाणी "केसीएस'ची समिती पाठविली होती. त्यांच्या आधारावर येथे तार केलेल्या समितीच्या अहवालावर "एसआयटी' स्थापन केली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. ज्या कंपन्यांनी परवाने नसताना उत्पादन केले किंवा परवानगी नसताना कीटकनाशक विक्री केली त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले.''

'पिकांच्या विषारी औषधांबाबत केंद्र सरकारचा जो कायदा आहे, त्यात काही बदल आम्ही सुचविले आहेत. नजीकच्या काळात हे बदल करीत आहोत. या संदर्भात उपाययोजनांवरही चर्चा झाली. यापुढे परवाना असलेली औषधेच बाजारात येतील, याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल,'' असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

दौऱ्यापासून माध्यमे दूर
या साऱ्या दौऱ्यापासून माध्यमांना दूर ठेवण्यात आले होते. माध्यमाच्या केवळ एका प्रतिनिधीला बोलावून मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड यांनाही या दौऱ्याची माहिती नव्हती. त्याबद्दल त्यांनीही आश्‍चर्य व्यक्त केले. या अगोदर कृषिमंत्र्यांच्या ताफ्यावर रोपटे फेकून मारल्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगून आंदोलनकर्ते देवानंद पवार, प्रहारचे कार्यकर्ते नितीन मिर्झापुरे, दारूबंदी समितीचे नेते महेश पवार, युवक कॉंग्रेसचे नेते यांना ताब्यात ठेवले होते.

Web Title: yavatmal vidarbha news 50 lakh fund for Inhibited insecticides patient