कीटकनाशकामुळे आणखी तीन बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

यवतमाळ - कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 18 शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, आज आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील 25 पेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये दृष्टिदोष निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत 692 लोकांवर विविध रुग्णालयांत उपचार झाले आहेत.

यवतमाळ - कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 18 शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, आज आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील 25 पेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये दृष्टिदोष निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत 692 लोकांवर विविध रुग्णालयांत उपचार झाले आहेत.

कीटकनाशकाची बाधा झालेल्या या तिन्ही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी भरती करण्यात आले होते. नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मारेगाव तालुक्‍यातील पिसगाव येथील शेतमजूर शंकर नागो आगलावे (वय 50), वणी तालुक्‍यातील आमलोण येथील दत्तात्रेय गजानन टेकाम (वय 35) यांचा वणी येथील सुगम हॉस्पिटलमध्ये, तर कळंब तालुक्‍यातील सावरगाव येथील गजानन नामदेव फुलमाळी यांचा यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज मृत्यू झाला.

या घटना वेगवेगळ्या तालुक्‍यांमधील असल्यामुळे त्यांची तीव्रता जाणवत नव्हती; मात्र यावर "सकाळ'ने प्रकाश टाकल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्र्यांकडे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे मागितला आहे.

पुण्यावरून कृषी आयुक्तालयाचा चमू जिल्ह्यात या प्रकरणाचा अहवाल तयार करण्यासाठी नुकताच येऊन गेला. समितीने कपाशीची उंची वाढल्याने व शेतकरी फवारणीदरम्यान योग्य काळजी घेत नसल्याने या घटना घडत असल्याची नोंद अहवालात केली; परंतु सत्य वेगळेच आहे.

शेतकरी फवारणीसाठी चायनीज पॉवर स्प्रे-पंपांचा वापर करत आहेत. त्या पंपांची क्षमता देशी पंपापेक्षा पाचपट जास्त आहे. तसेच वापरले जाणारे कीटकनाशक अतिशय जहाल आहे. दोन ते तीन औषधांचे मिश्रण करून शेतकरी फवारणी करीत आहे. त्यामुळे विषाची मात्रा एकदम वाढून त्याचा दुष्परिणाम होत आहे. तर जिल्ह्यात यंदा चोरबीटी मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहे. बीटी कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. अतिशय विषारी औषधानेही कीड नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी वारंवार जहाल स्वरूपाचे विषारी द्रव्य फवारत आहे. या प्रमुख कारणांचा ऊहापोहदेखील अहवालात करण्यात आला नाही.

आठ तालुके बाधित
जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत फवारणीमुळे गंभीर स्थिती आहे. यात दारव्हा, कळंब, झरी, दिग्रस, मारेगाव, पांढरकवडा, वणी, आर्णी आदी तालुक्‍यांचा समावेश आहे. फवारणीचा फास असाच सुरू राहिल्यास आगामी काळात बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: yavatmal vidarbha news three death by Insecticide