मिनीमंत्रालयात शिस्तीचा 'डोस' अनेकांच्या पचनी नाहीच; कर्मचाऱ्यांना पोशाख, ओळखपत्रांची 'ऍलर्जी'

yavatmal zp employees violate costume rule of state government
yavatmal zp employees violate costume rule of state government

यवतमाळ : शासकीय कार्यालयांत कार्यरत कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, या उद्देशाने पोशाख नियम (ड्रेसकोड) बंधनकारक करण्यात आला. तसा आदेश सामान्य प्रशासन विभागानेदेखील काढला. मात्र, मिनिमंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत 'त्या' आदेशाला तिलांजली दिली जात आहे. कर्मचाऱ्यांना पोशाखासह ओळखपत्रांची ऍलर्जी असल्याचे दिसून आले. 

विविध विभागांतून राज्य शासनाचा कारभार चालतो. कामानिमित्त नागरिक व लोकप्रतिनिधी कार्यालयात येतात. शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची वेशभूषा बघून अनेकदा धक्का बसतो. आपण शासकीय कार्यालयांत आलो की, महाविद्यालयात, असा प्रश्‍न पडतो. कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना अनुरूप ठरेल, अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते. प्रशासकीय कामकाजात नीटनीटेकेपणा आणण्यासाठी पोशाख व ओळखपत्रांचा डोस देण्यात आला. मात्र, मिनिमंत्रालयातील बहुतांश कर्मचारी आपल्या पूर्वीच्याच पेहरावात येत आहेत. 

प्रमुख विभागातील कर्मचारी ओळखपत्र सोडाच चक्क चप्पल घालूनच कार्यालयात प्रवेश करताना दिसतात. सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढले. ते येथे धडकले नाहीत का, असा प्रश्‍न अभ्यागतांकडून विचारला जात आहे. महिला कर्मचाऱ्यांना साडी, सलवार सूट, दुपट्टा, तर पुरुष कर्मचाऱ्यांना शर्ट, पँन्ट, असा पोशाख परिधान करावा, असे निर्देश दिलेले आहेत. गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम, चित्र असलेले कपडे परिधान करू नयेत, असे स्पष्ट निर्देश आहेत. तरीदेखील कारणांचा पाढा वाचला जात आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

अंमलबजावणी होईल, तेव्हा बघू -
सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढल्याची माहिती आहे. पोशाखाबाबत कोणतेही निर्देश वरिष्ठांकडून देण्यात आलेले नाहीत. पोशाखाबाबतचा निर्णय चांगलाच घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. त्यावेळी निश्‍चितच निमयांचे पालन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com