esakal | शिक्षकांच्या बदल्या नव्या धोरणानुसार, 'अवघड'गावांची सहा मेपर्यंत मागितली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

teachers

शिक्षकांच्या बदल्या नव्या धोरणानुसार, 'अवघड'गावांची सहा मेपर्यंत मागितली माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शिक्षकांच्या बदल्या यंदा नव्या धोरणानुसार होणार आहेत. त्यासाठी अवघड क्षेत्रांची निवड समिती सदस्यांनी सुचविल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत. समितील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना येत्या सहा मेपर्यंत माहिती पाठविण्याची 'डेडलाईन' देण्यात आली आहे.

हेही वाचा: 'नागरिकांनो! RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यास पाचव्या दिवशी करा HRCT'

जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशातच शासनाने शिक्षकांच्या बदल्या जिल्हास्तरावर करण्याबाबत धोरण निश्‍चित केले आहे. बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. शासन निर्णयानुसार येत्या ३१ मेपर्यंत बदल्या करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने अवघड क्षेत्राची निवड शासनाने गठित केलेल्या समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. समितीच्या अध्यक्षपदी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. समिती सदस्य म्हणून निवडणूक उपजिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक, बीएसएनएलचे प्रमुख, उपवनसंरक्षक व सचिव म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी आदी सदस्य आहेत. या सदस्यांना संपूर्ण बाबींचा आढावा घेऊन अवघड क्षेत्राच्या गावांची निवड करावयाची आहे. गेल्यावेळी बदल्यांमध्ये ८१ गावे अवघड क्षेत्रातील होती. यंदा या माहितीच्या अनुषंगाने सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रानुसार येत्या सहा मेपर्यंत माहिती पाठविण्याची डेडलाईन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठविलेली माहिती व पंचायत समितीस्तरावरून प्राप्त झालेल्या गावांच्या नावाची तपासणी करून अंतिम यादीवर समितीचे अध्यक्ष शिक्कामोर्तब करणार आहेत.

उत्सुकता शिगेला

यापूर्वीच्या बदल्यांत अनेक शिक्षक विस्थापित झाले होते. त्या शिक्षकांनी विभागीय आयुक्त व न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या बाजूने निकाल लागला. यानंतरही संबंधित शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली नव्हती. यंदाच्या बदल्यांमध्ये सोयीच्या ठिकाणी नेमणूक मिळेल, अशी आशा लावून शिक्षक बसले आहेत.

रिक्त पदांची आली माहिती

शासनाने शिक्षक बदल्यांचे धोरणनिश्चिती करताच जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत समितीला रिक्त पदे, सेवा ज्येष्ठता यादी, अवघड क्षेत्राची माहिती मागवून घेतली होती. माहिती बऱ्याच कालावधीनंतर पंचायत समितीस्तरावरून पाठविण्यात आली आहे. आता प्राप्त झालेल्या माहितीनुसार बदल्यांची तयारी प्रशासन करीत आहे.

loading image