'पीआरसी'ला सुका मेव्यापासून मांडे-मटणाचा पाहुणचार, सरबराईत कमी न पडण्याचा अधिकाऱ्यांचा दम?

सूरज पाटील
Friday, 12 February 2021

सभागृहात काजू, मनुका, बदाम, पिस्ता, अंजीर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपार व रात्रीच्या भोजनात शाकाहारासह मटण, चिकन, फिश, अंडाकरी, भाकर, पोळी, मांडे देण्यात येणार आहेत. सरबाईत कुठेही कमी पडता कामा नये, असा दम अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती आहे. 

यवतमाळ : जिल्ह्यात दीर्घ कालावधीनंतर पंचायतराज समिती (पीआरसी) येत्या मंगळवारी (ता.16) दाखल होत आहे. बैठकीचा कार्यक्रम निश्‍चित झाला असून, तीन दिवस पीआरसीचा विश्रामगृहात मुक्काम राहणार आहे. पीआरसीच्या सरबराईचे टेन्शन अधिकाऱ्यांना आहे. शाकाहारी जेवणासह मटण मांड्यांचा पाहुणचार दिला जाणार आहे. जिल्हा परिषद वर्तुळात 'पाहुणचारा'ची चांगलीच चर्चा सुरू आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या नवीन 'स्ट्रेन'ची भीती; २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

पंचायतराज समितीत 20 आमदारांचा समावेश असून, सुरुवातीला दौरा रद्द होणार असल्याची "हवा' देण्यात आली होती. मात्र, पीआरसीचा कार्यक्रम धडकताच अधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत. जिल्हा परिषदेतील लेखे अपटुडेट करण्यात आले. नवीन ट्यूबलाईट बसविण्यात आले. 16 ते 18 फेब्रुवारीपर्यंत पीआरसी जिल्ह्यात राहणार आहे. आमदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रायफ्रूट्‌स, शाकाहारी भोजन, मासाहारी मागणीनुसार देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने टेंडरच काढले आहे. नाश्‍त्यात उपमा, सांभारवा, इडली, आमलेट, बटर ब्रेड राहणार आहे. सभागृहात काजू, मनुका, बदाम, पिस्ता, अंजीर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपार व रात्रीच्या भोजनात शाकाहारासह मटण, चिकन, फिश, अंडाकरी, भाकर, पोळी, मांडे देण्यात येणार आहेत. सरबाईत कुठेही कमी पडता कामा नये, असा दम अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - Success Story : एकदाच केली दीड लाखांची गुंतवणूक आता...

झेडपीत सीईओंची साक्ष -
गेल्या 2010-2011 व 2016-2017च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषद संबंधातील परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सभागृहात साक्ष घेण्यात येणार आहे. विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची अनौपचारिक चर्चा करण्यात येणार आहे.

पीएचसीला देणार भेट -
पंचायतराज समितीचे सदस्य जिल्ह्यातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतींना भेटी देणार आहे. भेट द्यावयाच्या पंचायत समिती अद्याप निश्‍चित झाल्या नाहीत. पीआरसी सदस्य जिल्ह्यात आल्यावर ठरविणार आहेत.

हेही वाचा - किसान सन्मान योजनेचा निधी घेणे पडले महाग, आता सातबारावर चढणार बोजा

यांचा आहे समावेश -
पीआरसीप्रमुख डॉ. संजय रायमुलकर आहेत. सदस्य म्हणून प्रदीप जैस्वाल, कैलास पाटील, डॉ. राहुल पाटील, अनिल पाटील, संग्राम जगताप, दिलीप बनकर, शेखर निकम, सुभाष धोटे, माधव जळगावकर, प्रतिभा धानोरकर, हरिभाऊ बागडे, डॉ. विजयकुमार गावित, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, डॉ. संजय कुटे, राणा जगजितसिंग पाटील, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, किशोर जोरगेवार आदींचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal zp will offer dry fruits and non veg party to prc team