येचुरींनाही बसला आश्‍चर्याचा धक्का!

येचुरींनाही बसला आश्‍चर्याचा धक्का!

नागपूर - अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंधाचा विषय साऱ्या देशात वादाचा ठरलेला असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांचे व्याख्यान ऐनवेळी रद्द करण्याची घटना अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. खुद्द येचुरी यांनी दिल्लीत याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केल्याने हे प्रकरण अधिक गूढ बनले आहे. दरम्यान, आंबेडकरवादी संघटनांच्या प्रतिनिधींनी याचा जाब विचारण्यासाठी आज विद्यापीठावर धडक दिली, तर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी या विषयावर ‘नो कॉमेंट्‌स’ एवढीच प्रतिक्रिया दिली. कुलगुरूंवर कुणी तरी दबाव आणून हा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. 

विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे ‘संविधान काल आणि आज’ या  विषयावर १८ मार्चला दीक्षान्त सभागृहात येचुरींचे व्याख्यान आयोजित केले होते. ते काल, बुधवारी अचानक रद्द करण्यात आले. येचुरींनीच दिल्लीत सांगितलेल्या घटनाक्रमाप्रमाणे, साधारणतः महिनाभरापूर्वी येचुरींना त्यासंबंधी विद्यापीठातर्फे विचारणा करण्यात आली, त्यांनी होकार दिला, विद्यापीठाने त्यांना विमानाची तिकिटे पाठवली आणि कार्यक्रम २-३ दिवसांवर आलेला असताना तो ‘अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे’ असा निरोप येचुरींना मिळाला. त्यामुळे त्यांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना येचुरींनी ही माहिती दिली. मी नागपूरला जाण्यासाठी तयारी केली होती. पण, ऐनवेळी मला  कार्यक्रम स्थगित झाल्याचे कळविण्यात आले, असे ते म्हणाले. 

रा. स्व. संघाच्या दबावामुळे हा कार्यक्रम रद्द झाल्याची वदंता आहे. त्याच वेळी डॉ. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी कुलगुरूंची परवानगी न घेता परस्पर हा कार्यक्रम आयोजित केल्याची दुसरी ‘थिअरी’ही सांगितली जाते. कुलगुरू डॉ. काणे यांनी या वादाला तिसरा आयाम जोडला.   
माजी मंत्री नितीन राऊत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या नेतृत्वात नागेश चौधरी, डॉ. ताराचंद खांडेकर, प्रा. अशोक गोडघाटे, अमन कांबळे, त्रिशरण सहारे आदींनी कुलगुरूंची भेट घेतली. सुमारे तासभर त्यांच्यात बंदद्वार चर्चा झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण  होण्याची शक्‍यता असल्याने व्याख्यान रद्द केल्याचे कुलगुरूंनी म्हटल्याची माहिती डॉ. यशवंत मनोहर यांनी पत्रकारांना दिली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न हा आणखी एक आयाम यानिमित्ताने या वादाला जोडला गेला आहे.  
घडलेला प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचा आरोप डॉ. मनोहर यांनी केला. आम्ही पुन्हा सीताराम येचुरी यांची वेळ घेऊन त्यांना नागपूरला बोलावू आणि कुठल्याही परिस्थितीत कार्यक्रम आयोजित करू, अशी घोषणा माजी मंत्री नितीन राऊत यांनी केली.  

नो कॉमेंट्‌स - डॉ. काणे

कुलगुरू डॉ. काणे यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी व्याख्यानाला आपण परवानगी दिली नव्हती हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. मात्र, कार्यक्रम रद्द करण्याचे कारण काय, अशी विचारणा केली असता ‘नो कॉमेंट्‌स’ एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. 


साऱ्यांचे घूमजाव - डॉ. आगलावे

सीताराम येचुरी यांच्या कार्यक्रमाची रीतसर परवानगी घेतली होती. तसे पत्रही दिले होते.  त्यानंतरच निमंत्रण पत्रिका छापून घेतल्या. कुलगुरू, प्र-कुलगुरू,  कुलसचिव यांना सर्वांना विचारणा केल्यानंतरच कार्यक्रमाचे नियोजन झाले. मात्र, आता ते घूमजाव करीत आहेत. 
- डॉ. प्रदीप आगलावे, प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com