मोठे ध्येय बाळगा, संघर्ष कायम ठेवा - राहुल माकनीकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

नागपूर - आपल्या क्षमता ओळखा. अपेक्षांची उंची वाढवा. मोठे ध्येय बाळगा. संघर्षामुळे व्यक्तिमत्त्वाला धार येते. यामुळे प्रवाहाविरोधात जाऊन संघर्षरत राहा, हा यशाचा गुरुमंत्र पोलिस उपायुक्त राहुल माकनीकर यांनी रविवारी तरुणाईला दिला.

नागपूर - आपल्या क्षमता ओळखा. अपेक्षांची उंची वाढवा. मोठे ध्येय बाळगा. संघर्षामुळे व्यक्तिमत्त्वाला धार येते. यामुळे प्रवाहाविरोधात जाऊन संघर्षरत राहा, हा यशाचा गुरुमंत्र पोलिस उपायुक्त राहुल माकनीकर यांनी रविवारी तरुणाईला दिला.

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे ग्लोकल मॉल येथे आयोजित तीनदिवसीय यिन यूथ समिटच्या समारोपीय सोहळ्यात ते बोलत होते. वंजारी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संचालक डॉ. हेमंत सोनारे व्यासपीठावर उपस्थित होते.
राहुल माकनीकर यांनी जगातील नावाजलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संघर्षाची गाथा विद्यार्थ्यांपुढे मांडली. निधड्या छातीने पुढे जाऊन परिस्थिती बदलण्याची क्षमता युवकांमध्ये आहे. पण, आज पदव्या घेण्याची प्रवृत्ती वाढली. ज्ञान बंदिस्त झाले आहे. 

विसंगत विचार केले जात आहेत. त्यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. दगडाला आकार येण्यासाठी टाकीचे घाव सहन करावे लागतात. अंधकार हीच उजेडाची नांदी असते. यामुळे कठीण प्रसंगात विचलित होऊ नका. ती संधी माना. चांगल्या दिवसांची ती सुरुवात समजा. यशस्वी वाटचालीसाठी बाह्यप्रेरणा नाही, तर आंतरप्रेरणा आवश्‍यक आहे. लोकांचे आदर्श घेण्याचा जमाना आता संपला आहे. आपणच लोकांचे आदर्श होऊ या जिद्दीने प्रयत्न करा. मी मोठा होईल यापेक्षा आपल्यासह सर्व मोठे होतील का, याचा विचार करणारे आपसुकच मोठे होतात, असा हितोपदेश त्यांनी दिला. संचालन दीपक चटप याने केले. गणेश घोलप यांनी आभार मानले.

सहकार, व्हॅल्यू ॲडिशन समृद्धीचा मंत्र : डॉ. सोनारे 
कापसाचे उत्पादन विदर्भाची स्ट्रेन्थ आहे. त्यावर आधारित वस्त्रोद्योगाला मोठी संधी आहे. शेतकऱ्यांनी कापूस विकून देण्यापेक्षा सहकार तत्त्वावर व्हॅल्यू ॲडिशन केल्यास गावे स्वयंपूर्ण होतील. विद्यार्थ्यांनीसुद्धा नोकऱ्यांच्या शोधात फिरण्यापेक्षा व्यावसायिक स्वरूपात शेती केल्यास निश्‍चितच समृद्धी प्राप्त होईल, असा हितोपदेश डॉ. हेमंत सोनारे यांनी दिला. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी नाहीत. परिणामी नैराश्‍याचे वातावरण आहे. शिक्षण घेणे, पदवी संपादित करणे, त्यानंतर रोजगारासाठी भटकणे हाच शिक्षणाचा पॅटर्न सेट झाला आहे. युवक असाह्य स्थितीत आहेत. अशा स्थितीत डिग्री मिळवाच, त्यासोबत शेतीही स्वीकारा. शेती व्यवसाय स्वरूपात केल्यास नफा निश्‍चितच मिळतो. आपली स्ट्रेन्थ ओळखा. सेल्फ ॲनालिसिस करा. गोल निश्‍चित करा. योग्य अप्रोच ठेवा.

सहकार, व्हॅल्यू ॲडिशन समृद्धीचा मंत्र - डॉ. सोनारे 
पॅशन, कमिटमेंट या बाबी असल्यास निश्‍चितच यश मिळते. वस्त्रोद्योग आणि फॅशन क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. कधीही न संपणाऱ्या या उद्योगात २० प्रकारचे प्रोफेशन उपलब्ध आहेत. सर्व प्रकारचे न्यून बाजूला सारा. प्रगती स्वत:लाच करावी लागणार आहे. यामुळे ध्येय निश्‍चित करून पुढे जा. संपूर्ण जग आज स्मार्ट फोनवर उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करा. कटिबद्धता, परिश्रमाला पर्याय नाही, हे ध्यानात ठेवून इच्छित मार्ग धुंडाळा. यश निश्‍चितच मिळेल, असा सल्ला त्यांनी दिला.

Web Title: YIN Summer Youth Summit rahul maknikar