वाशीम : लोकसभेसाठी भाजपचा ‘योगी पॅटर्न’?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

वाशीम : गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेचा बेलाग बालेकिल्ला असलेल्या वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदार संघात निवडणूक पूर्व राजकीय चाचपणीला सुरुवात झाली आहे. गेली 20 वर्षे शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून युती धर्म पाळणार्‍या भाजपला या मतदार संघात ‘एकला चलोरेची’ भूमिका निभवावी लागणार असल्याचे चित्र समोर येत आहे. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजपने अध्यात्मिक गुरू प्रेमा साई यांच्या रूपाने निवडणुकीत उतरण्याचा चंग बांधल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.

वाशीम : गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेचा बेलाग बालेकिल्ला असलेल्या वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदार संघात निवडणूक पूर्व राजकीय चाचपणीला सुरुवात झाली आहे. गेली 20 वर्षे शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून युती धर्म पाळणार्‍या भाजपला या मतदार संघात ‘एकला चलोरेची’ भूमिका निभवावी लागणार असल्याचे चित्र समोर येत आहे. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजपने अध्यात्मिक गुरू प्रेमा साई यांच्या रूपाने निवडणुकीत उतरण्याचा चंग बांधल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे मतदार संघात दौरे वाढले असून, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवर खासदार भावना गवळी कसा विजय मिळवितात? याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे. 

लोकसभा निवडणुकांना सात महिन्यांचा कालावधी उरला आहे. वाशीम लोकसभा दोनवेळा तर मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर वाशीम- यवतमाळ लोकसभा मतदारसंघही दोनवेळा खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेच्या खाती जमा केला आहे. त्यांच्या चारही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाची शिवसेनेसोबत युती होती. मात्र, यावेळी शिवसेना व भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरतील असा अंदाज आहे. भाजप वाशीम लोकसभा मतदार संघात प्रथमच स्वबळावर निवडणूक लढणार असल्याने, या पक्षाने ‘योगी पॅटर्न’चा आधार घेतल्याची चर्चा आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते राजनाथ सिंग, मनेका गांधी, वरुण गांधी यांचे अध्यात्मीक गुरू म्हणून ओळख असलेले प्रेमा साई यांच्या नावाचा गंभीरतेने विचार केल्याची माहिती आहे. प्रेमा साई यांच्या प्रेमा साई फाऊंडेशन मार्फत विविध सामाजिक कामांमध्ये यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात मोठे योगदान असल्याने भाजपसाठी हा चेहरा पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळातही पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. विधान परिषदेचे माजी सभापती माणिकराव ठाकरे यांचे दौरे जिल्ह्यात वाढले आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेसमोर डागडुजीचे आव्हान!
या मतदारसंघावर गेली 20 वर्षे एकहाती सत्ता गाजविणार्‍या शिवसेनेसमोर भाजपच्या रूपाने कालचा मित्र, प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहणार आहे. तसेच खासदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांमधील बेबणाव हा आता जिल्ह्यामध्ये सर्वश्रृत झाला आहे. यवतमाळ जिल्ह्याबरोबरच वाशीम जिल्ह्यातही शिवसेनेत दोन तट उभे राहिल्याने शिवसेनेची तटबंदी सांभाळण्यासाठी विद्यमान खासदार भावना गवळी यांचा कस लागणार आहे.

Web Title: yogi pattern for loksabha on vashim by BJP