विषारी औषध पिऊन सारदे येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

प्रशांत बैरागी
बुधवार, 4 एप्रिल 2018

सारदे गावातील मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून मयत युवा शेतकरी प्रवीण देवरे यांची पंचक्रोशित ओळख होती. त्यांना महाविद्यालयीन काळापासून सामाजिक कार्याची आवड होती. सारदे गावाचे पाच वर्षे सरपंच म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे कामकाज सांभाळुन ग्रामविकासात मोलाची भूमिका बजाविली. त्यांच्या मागे विधवा आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. खासगी आश्रमशाळेतील शिक्षक राजेंद्र देवरे यांचे ते बंधू होत.

नामपूर : पीक चांगले येऊनही भाव नसल्याने सारदे ( ता. बागलाण ) येथील एका शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करुन आपली जीवनयात्रा संपवली. बागलाणसारख्या सधन तालुक्यात गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्येचे लोण वाढल्यामुळे तीव्र चिंता व्यक्त होत आहे. 

प्रवीण कैलास देवरे ( वय ४२ ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी ( ता. ३) रात्री ही घटना घडली. मयत प्रवीण देवरे यांची एकत्र कुटुंब पद्धतीत सुमारे १० एकर क्षेत्र आहे. कांदा, मका, डालिम्ब अशी प्रमुख पिके घेऊन कुटुंबाचा गाडा ओढण्याचे काम ते करीत होते. परंतु गेल्या वर्षभरापासून पाणीटंचाई, वाढती महागाई, शेतमालाला हमीभावाचा अभाव, मार्च अखेर बँकांच्या वसूलीचा तगादा आदी अडचणींमुळे त्यांचे आर्थिक अडचणी जाणवत होती. शेतीत लाखो रूपयांचे भांडवल टाकूनही उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने मयत देवरे यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. त्यांच्यावर नामपूर येथील देना बँकेचे १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज होते. खासगी व बँकांचे कर्जाची परतफेड कशी करायची, याच तणावात ते गेले काही दिवस होते.  

बँकांच्या कर्जाचा आकडा फुगतच चालल्याने  वैफल्यग्रस्त बनलेल्या प्रवीण देवरे यांनी विषारी औषधाचे प्राशन केले. रात्री त्यांचा शोध घेतला असता शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर तातडीने त्यांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला.

बुधवारी ( ता. ४ ) शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तलाठी एस एस गायकवाड यांनी घटनेबाबत बागलाणचे तहसीलदार यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. घटनेबाबत जायखेड़ा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक श्रीराम कोळी पुढील तपास करीत आहेत.

Web Title: A young farmer did suicide with poison sarade village