त्या "मिक्‍सर मशीन'ने केला घात; युवकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

सिमेंट कॉंक्रीट बनविणाऱ्या मिक्‍सर मशीनवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. 4) दुपारी दोनच्या सुमारास चुरडी रस्त्यावर घडली. श्रीधर ऊर्फ कालू हरिदास ढेंगे (वय 26, रा. चुरडी) असे मृताचे नाव आहे.

तिरोडा (जि. गोंदिया) : जिल्ह्यातील काही भागांमध्ये रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, ते अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत. 

सिमेंट कॉंक्रीट बनविणाऱ्या मिक्‍सर मशीनवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीचालक श्रीधर ऊर्फ कालू हरिदास ढेंगे (वय 26, रा. चुरडी) जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. 4) दुपारी दोनच्या सुमारास घडली.  तो दुपारच्या जेवणासाठी घरी जात असताना हा अपघाता घडला. श्रीधर ढेंगे हा तिरोडा येथील इरसाद मिस्त्री यांच्या गॅरेजमध्ये मिस्त्री म्हणून कामावर होता. 

नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास तो दुचाकीने (क्र. एमएच 35-टी 8915) दुपारच्या जेवणासाठी गावी चुरडी येथे जात होता. मात्र गावाच्या रस्त्यावर विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत नालीबांधकाम सुरू आहे. त्यामुळे बांधकामाशेजारी असलेल्या एमिक्‍सर मशीनला (क्र. एमएच 35-एजी 5986) असंतुलित झालेली श्रीधरची दुचाकी आदळली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. श्रीधरच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. येथील रुग्णालयात शववचिछेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे. 

रस्ता, नालीबांधकाम अपघातांना कारणीभूत 

तालुक्‍यात रस्ता, नालीबांधकाम सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदारांकडून कामे झाल्यानंतर साहित्य जागच्या जागीच ठेवले जातात. गिट्टी रस्त्यावर पसरली असते. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. गिट्टीवरून दुचाकी घसरून अनेक किरकोळ अपघात घडत आहेत. त्यामुळे कंत्राटदाराने साहित्य बाजूला ठेवणे गरजेचे झाले आहे. 

हे वाचा : बहिणीच्या विलापाने गावकऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू
 

नियमांची पायमल्ली 

कंत्राटदरांकडून नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. रस्त्याचे बांधकाम सुरू असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साहित्य पडले असते. ते साहित्य रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात यावे, असा साधा नियम आहे. मात्र, कंत्राटरांकडूनही ते होताना दिसून येत नाही. तसेच निधीअभावी किंवा मजूर नसल्यामुळे अनेक कामे अर्धवट आहेत. महिनोन्‌महिने कामे बंद असतात, अशा प्रसंगी रस्त्यावरील साहित्य संपूर्ण रस्त्यावर येते आणि वाहन चालविताना त्रास होतो. यातून अपघाताची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. अधिकारीही याकडे लक्ष देत नाही, असा आरोप करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man dies after accident at gondia