बहिणीच्या विलापाने गावकऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

सैन्यात जाण्याचे स्वप्न बागळून महामार्गावर सरावासाठी जाणाऱ्या एका 16 वर्षीय मुलाला बेलोरे गाडीने जोरदार धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. अनाथ बहिणीच्या भावाचा मृत्यू झाल्याने सर्वांचे डोळे पाणावले होते. 

काटपूर (जि. अमरावती) : युवक-युवतीचे प्रेम जसे वेगळे असते, त्याहीपेक्षा मोठे आई आणि मुलाचे प्रेम असते. तसेच भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा विचारच आनंद देऊन जातो. भाऊ-बहिणीचे नाते खूपच वेगळे. लहानपनी छोट्या-छोट्या गोष्टीसाठी भांडण करीत आई-वडिलांकडे एकमेकांची तक्रार घेऊन जात आनंद साजरा केला जातो. एकमेकांची वस्तू लपवून त्रास देण्यातच लहानपण जाते. 

मोठे झाल्यावर मात्र एकमेकांची काळजी घेतली जाते. एकमेकांसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. भावासाठी बहीण लाडाची होऊन जाते. तो तिची नेहमीच काळजी घेत असतो. तिच्या सर्व गरजा पूर्ण करण्यावर त्याचा भर असतो. तिला कॉलेजात सोडणे, गीफ्ट देणे असे कार्य भाऊ करीत असतो. तर बहीण भावाला बाबापासून वाचवित असते. त्याच्या खोळ्या लपविण्याचा प्रयत्न ती करते. जेवण वाढण्यापासून त्याचे कपडे धुऊन देण्याचे काम बहीण करते. लहानपणाच्या अगदी उलट मोठे झाल्यावर होते. मात्र, लाडाच्या भावाच्या मृत्यूनंतर बहीणला काय वाटतं असेल याचा विचार न केलेलाच बरा. मात्र, अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यात घडली. 

बापरे! - तळीराम मास्तराची 'मधू'शाळा 

बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरविलेला भाऊ अनिकेत गणेश धोंडे (वय 16) व बहीण वैष्णवी एकमेकांना आधार देत काका व आजीच्या छत्राखाली जीवन जगत होते. आई-वडील नसल्यामुळे लहान बहिणीसाठी मोठा भाऊच सर्वस्व होता. मात्र, तो अचानक सोडून गेल्याने तिच्या आक्रोशाने गावकऱ्यांच्या डोळ्यांनाही धारा लागल्याच्या व अंगावर शहारे आणणारा प्रसंग अनेकांनी सोमवारी अनुभवला. 

अनिकेत व सावरखेड पिंगळाई येथील आठ ते दहा महाविद्यालयीन विद्यार्थी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न घेऊन दररोज सकाळी सरावासाठी 274 राज्यमार्गावर जात होते. सोमवारी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सावरखेडनजीक अर्धा किलोमीटर अंतरावर अमरावतीहून भरधाव येणाऱ्या बोलेरो गाडी क्र. एमएच 30 पी 3047 ने जोरदार धडक दिल्याने अनिकेत धोंडे हा जागीच ठार झाला तर सोबत असलेला जय विलास डहाणे (वय 16) हा किरकोळ जखमी झाला. 

ही बातमी अवश्य वाचा - स्कूल बसच्या दारुड्या चालकाच्या भरवशावर छकुला सोडणार का?

सुटीच्या दिवशी करायचा मजुरी

अनिकेत हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. लहानपणीच त्याचे आई-वडील मरण पावल्यामुळे छोटी बहीण वैष्णवीसह काका व आजीकडे तो राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे सुटीच्या दिवशी मोलमजुरी करून स्वत:चे व बहिणीचे संगोपन करीत होता. त्यामुळे कुटुंबाला अनिकेतची गरज होती. 

माझा भाऊ आणून द्या

पुढच्या महिन्यात भारतीय सैन्यात जागा निघणार होत्या. नोकरी मिळावी म्हणून तो दररोज मित्रांसोबत सरावासाठी जात होता. भविष्याचे रंगीत स्वप्न पाहत असताना काळाने अपघाताच्या रूपात झडप घालून त्याला कवेत घेतले. त्याची लहान बहीण निराधार झाल्याने भावाप्रती आक्रांत करून "मला माझा भाऊ आणून द्या' असा आरडाओरड करून रडत होती. हे दृष्य पाहून ग्रामवासींचेसुद्धा डोळे पाणावले होते. 

पाच तासांत लावला गाडीचा शोध

शिरखेड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ठाणेदार केशवराव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार मनोज टप्पे, कॉन्स्टेबल रामेश्‍वर इंगोले यांनी नांदगाव पेठ टोलनाक्‍याच्या सीसीटीव्ही फुटेजवरून गाडीचा पत्ता लावला. मोर्शी उपविभागीय अधिकारी, बेनोडा ठाणेदार, वरुड ठाणेदार यांना माहिती देऊन अवघ्या पाच तासांत अपघातातील गाडीचा पत्ता लावून गुन्हा दाखल केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The child's death in an accident