ज्येष्ठांसाठी जगणारे "यंग सिनियर'

बबनराव वानखेडे
बबनराव वानखेडे

यशोदानगर : सेवानिवृत्तीनंतर कुटुंबीय व नातेवाइकांच्या गोतावळ्यात सुखा-समाधानाने उर्वरित आयुष्य काढणारे शेकडो "यंग सिनियर्स' पाहायला मिळतात. मात्र, काही जण याला अपवादही आहेत. बबनराव वानखडे अशाच ज्येष्ठ नागरिकांपैकी एक. त्यांनी निवृत्तीनंतर चार भिंतीच्या आड आयुष्य न घालविता समाजाच्या भल्यासाठी स्वत:ला झोकून देत नवा आदर्श निर्माण केला.
यशोदानगर, हिंगणा रोड येथील 75 वर्षीय बबनराव 2002 मध्ये महाराष्ट्र कॉटन फेडरेशनमधून विभागीय व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले. आयुष्यभर रक्‍ताचे पाणी केल्यानंतर अनेकांनी त्यांना घरी बसून आराम करण्याचा सल्ला दिला. मात्र, बबनराव यांनी त्यांचा सल्ला न जुमानता आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. स्व. डॉ. श्रीपाद सुकळीकर यांच्या समाजसेवेने प्रेरित होऊन त्यांनी श्रीरेणुका परिवार ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या माध्यमातून गेल्या दीड-एक दशकांपासून ते ज्येष्ठांची नि:स्वार्थपणे सेवा करीत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांच्या छोट्या-मोठ्या समस्या सोडविणे, अडचणीत असलेल्यांना आर्थिक मदत करणे, कौटुंबिक कलह मिटविणे, कायदेशीर सल्ला देणे, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्‍न शासनदरबारी मांडणे, विविध शासकीय सोयी-सवलतींचा फायदा मिळवून देण्यासह विविध कल्याणकारी उपक्रम ते नियमितपणे राबवीत आहेत. याशिवाय ज्येष्ठांसाठी आयोजिण्यात येणारी आरोग्य शिबिरं, सहली, चर्चासत्र, कार्यशाळा, अधिवेशनाच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवीत आहेत. बबनरावांच्या प्रयत्नांमुळेच शहरातील ज्येष्ठ नागरिकांना दहा विरंगुळा केंद्र मिळाले आहेत. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ज्येष्ठांना वातानुकूलित ग्रीन बस मिळवून देण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. युवा मतदारांना मतदानासाठी प्रेरित करणे असो किंवा नैसर्गिक संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात देणे असो, बबनराव नेहमीच पुढाकार घेणारे पहिले व्यक्‍ती असतात.
फेस्कॉमच्या पूर्व विदर्भ प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष, केंद्रीय कर्मचारी महाराष्ट्र सदस्य व अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सदस्य असलेल्या बबनरावांना आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसाठी भविष्यात खूप कामे करावयाची आहेत. विशेषत: राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. धोरणाची काटेकोर अंमलबजावणी झाल्याशिवाय ज्येष्ठांचा सर्वांगीण विकास होणे अशक्‍य असल्याचे त्यांचे प्रामाणिक मत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना नि:शुल्क आरोग्य सुविधांसोबतच वयोमर्यादा 65 वरून 60 वर्षे करणे, पेन्शनमध्ये तीन हजारापर्यंत वाढ करणे, या गोष्टीही आपल्या अजेंड्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
मला समाजाने पैसा, मानसन्मान, प्रतिष्ठा खूप काही दिले. त्यामुळे समाजाची परतफेड करायला पाहिजे, असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळेच मी समाजसेवेचे हे व्रत हाती घेतले आहे. शरीर साथ देईपर्यंत आणि सहकाऱ्यांची साथ असेपर्यंत, माझे हे सेवाकार्य अखंडपणे सुरूच राहील.
-बबनराव वानखडे, ज्येष्ठ नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com