मेंदी काढण्यापूर्वीच युवतीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

अमरावती : भावी वैवाहिक आयुष्याची स्वप्ने मनात रंगवीत असलेल्या युवतीच्या हाताला मेंदी लागण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेत तिच्या भावाची प्रकृती गंभीर आहे. युवती आणि तिच्या भावाला केळीतून विषबाधा झाल्याचे सांगण्यात येते. वाशीम जिल्ह्यात मोहगव्हाण (ता. कारंजा लाड) येथे ही घटना शुक्रवारी (ता. 27) घडली.

कंचन जगन्नाथ अघम (वय 21), असे मृत युवतीचे तर अभिषेक जगन्नाथ अघम (वय 18), असे विषबाधा झालेल्या युवकाचे नाव आहे. जगन्नाथ अघम यांनी गुरुवारी (ता. 26) घरी केळी आणली होती. कंचन आणि अभिषेक यांनी शुक्रवारी सकाळी केळी खाल्ली. अभिषेक हा नजीकच्या झोडगा येथील महाविद्यालयात बारावीचा विद्यार्थी आहे. तो केळी खाऊन महाविद्यालयात गेला. महाविद्यालयात त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला कारंजा येथे पाठविण्यात आले. दरम्यान, घरी असलेल्या कंचनचीसुद्धा प्रकृती खालावली. तिला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिला विषबाधा झाल्याचे निदान करून प्रकृती गंभीर असल्याने तातडीने इतरत्र हलविण्याची सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार कुटुंबीयांनी कंचनला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दुपारी एक वाजता दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. श्‍वसननलिकेत केळी अडकल्याने तिचा मृत्यू झालेला असावा, असा प्राथमिक अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदविला. कंचन आणि अभिषेक यांना विषबाधा नेमकी कशातून झाली, ही बाब तिच्या वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होणार आहे. तथापि, भावंडांनी केळीशिवाय दुसरे काहीच खाल्ले नव्हते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. कंचनचे लग्न नुकतेच जुळले होते, लवकरच तिचे शुभमंगल होणार होते, असे नातेवाइकांनी सांगितले. मात्र, त्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young woman dies before wedding