तरुणीने धुडकावली लग्नाची ‘ऑफर’; एका मुलाचा पिता असल्याची माहिती लपविली

The young woman turned down the offer of marriage Amravati crime news
The young woman turned down the offer of marriage Amravati crime news

अमरावती : विवाहित आणि एका मुलाचा बाप असलेल्या व्यक्तीने तरुणीपुढे लग्नाची ऑफर ठेवली. परंतु, तरुणीने ऑफर धूडकावल्याने तो जाम चिडला. त्याने थेट तिच्या वसतिगृहापर्यंत धाव घेण्याचे धाडस केले. सुशील देविदास मेश्राम (वय ३५, रा. दत्तात्रेयनगर, यवतमाळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित आणि एका मुलाचा बाप झाल्यानंतरही सुशील एका महाविद्यालयीन तरुणीच्या प्रेमात पडला. दोन वर्षांपर्यंत त्या दोघांची मैत्री राहिली. सुशीलने तरुणीपासून तो विवाहित आणि एका मुलाचा बाप असल्याची माहिती लपवून ठेवली होती. परंतु, ज्यावेळी तरुणीला तिच्या आयुष्याचा जोडीदार होण्याचे स्वप्न रंगविणारा सुशील हा आधीच विवाहित असल्याचे कळले तेव्हा ती पार भांबावून गेली.

अधिक वाचा - ‘आई तुझ्याशी शेवटचे बोलायचे... मृत्यूला कवटाळण्यापूर्वी तुझा आवाज मला ऐकायचा आहे...’
 
तरुणीने सुशीलसोबत संपर्क करणे व बोलणे बंद केले. तरुणी आपल्याला टाळत असल्याचे लक्षात येताच त्याने मोबाईलवर संपर्क करायला सुरुवात केली. तरीही ती विवाह न करण्याच्या निर्णयावर ठाम होती. त्याच्यासोबत संपर्कच ठेवायचा नसल्यामुळे तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. त्यानंतर तो तिचा पाठलाग सोडवायला तयार नव्हता.

सुशीलने तरुणीचे वसतिगृह गाठून तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. एकदा नव्हे तर चौथ्यांदा सुशील तरुणीच्या वसतिगृह परिसरात गेला व पुन्हा लग्नाची मागणी केली. लग्न न केल्यास तमाशा करण्याची धमकी दिली. तरीही तरुणीचा लग्न न करण्याचा निर्णय कायम होता. त्याने बळजबरीने वसतिगृह परिसरातून तिला कारमध्ये कोंबून चांदूररेल्वे ते देवगाव मार्गावरील एका ढाब्यावर नेले.

त्याठिकाणी चाकूचा धाक दाखवून लग्न न केल्यास स्वत: व तिच्याही जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीला अमरावतीत आणून सोडले. पीडितेने अखेर गाडगेनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी सुशील मेश्रामविरुद्ध विनयभंग, अपहरण व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीच्या अटकेचे प्रयत्न सुरू
प्रकरण महिला अत्याचाराशी संबंधित असल्यामुळे तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली. पसार संशयित आरोपीच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत.
- आसाराम चोरमले,
पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com