युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात

file photo
file photo

नागपूर : उपराजधानीत अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींचे प्रमाण मोठे आहे. विशेषत: उच्चभ्रू वर्गात व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. युवा पिढी तसेच उच्चभ्रू समाजात व्यसनांकडील ओढा वाढला आहे. शिवाय व्यसनामुळे वेगळाच आनंद मिळतो, रिलॅक्‍स वाटते, ताण-तणाव कमी होतो, असेही गैरसमज आहेत.
देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली शहरातील तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात सापडली असून, पोलिसांची वेळोवेळी कारवाई होत असली तरी हे अमली पदार्थ नशेखोरांना सहज उपलब्ध होत आहेत. महाविद्यालय परिसरात विशेषत: अभियांत्रिकीसारख्या महाविद्यालयांजवळ अमली पदार्थ उपलब्ध होत असले तरी उघडपणे विकले जात नाही. विकत घेणारा विकणाऱ्यांच्या सहज लक्षात येतो. मोमिनपुरा, हसनबाग, ताजबाग, सदर, मानकापूर, धरमपेठ, एमआयडीसी, बजेरिया, रेल्वेस्थानक परिसरात ग्राहकी मोठी असल्याने विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असल्याची पोलिसांची माहिती आहे.
पाकिस्तान, नायजेरिया, नेपाळ आदी देशांमध्ये गर्द तयार होते. विशाखापट्टणम, आदिलाबाद, उडिशातील संबलपूर, अंगूल, ढेकनाल, बलंगीर या भागात गांजा व चरसचे तर मराठवाडातील काही जिल्ह्यातही चोरून अफूचे उत्पादन घेतले जाते. रेल्वे व रस्ते मार्गाने ट्रक, बस वा इतर वाहनांमध्ये इतर मालांच्या आड दडवून अमली पदार्थ आणले जातात. शहरात अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाणात गांजा व गर्द (मॅफेडोन, हेरॉईन किंवा ब्राऊन शूगर) विकले जाते.
व्यसनामुळे तरुणाई सैरभैर
अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्ती एकलकोंड्या असतात. कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये त्यांचा संवाद नसतो. काही ना काही कौटुंबिक समस्या त्यांना असतात. अमली पदार्थांमधील काही द्रव्यांमुळे व्यक्तीला वेगवेगळे भास होतात. त्याला आपण "हॅल्युसिनेशन' असे म्हणतो. हे भास इतके तीव्र स्वरूपाचे असतात की, त्यामुळे हे पदार्थ सेवन केलेली व्यक्ती सैरभैर होते. काही "स्टिम्युलन्स' असे असतात की, त्यामुळे त्या व्यक्तीला आपण हवेत तरंगत आहोत, असे वाटते आणि त्यामुळे या अमलाखाली असताना या व्यक्ती उंचावरून खाली उडी मारतात आणि स्वत:चा जीव गमावतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com