विलगीकरण केंद्रात युवकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

अजमल खान सत्तार खान (वय 28, रा. प्रभाग दोन, नांदगावखंडेश्‍वर) याने 27 जून रोजी विलगीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहातील खिडकीला स्वत:जवळ असलेला दुपट्टा बांधून गळफास घेतल्याची घटना सकाळी 7.15 वाजताच्या दरम्यान घडली. 

नांदगावखंडेश्‍वर (अमरावती) : शहरात 24 जूनपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. परंतु, पुण्यावरून आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने शहरात कोरोनाचा प्रवेश झाला. त्याच्या संपर्कातील एका युवकाने विलगीकरण केंद्रात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 27) सकाळी विलगीकरण केंद्रात घडली. 

25 जून रोजी नांदगावखंडेश्‍वर शहरात पुण्यावरून आलेल्या 28 वर्षीय युवकाचा आरोग्य तपासणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या नांदगावखंडेश्‍वर येथील 27 नागरिकांना अमरावती ते यवतमाळ रोडवरील समाजकल्याण निवासी वसतिगृहात विलगीकरण करण्यात आले होते. त्यामधील अजमल खान सत्तार खान (वय 28, रा. प्रभाग दोन, नांदगावखंडेश्‍वर) याने 27 जून रोजी विलगीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहातील खिडकीला स्वत:जवळ असलेला दुपट्टा बांधून गळफास घेतल्याची घटना सकाळी 7.15 वाजताच्या दरम्यान घडली. 

तथापि, अजमल खान सत्तार खान याने विलगीकरणातील सहकाऱ्यांसोबत सकाळी चहा व नाश्‍ता केला. त्यानंतर सर्व बाहेर असताना अजमल खान याने विलगीकरण केंद्रात जाऊन आत्महत्या केल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली. सदर घटनेची माहिती शहरात पसरताच खळबळ उडाली. चांदूररेल्वेचे उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील व उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी नागरिकांची समजूत काढली. त्यांच्यात झालेला गैरसमज दूर करून सदर मृत अजमल खान सत्तार खान याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. 

हेही वाचा : धापेवाडा यात्रेची 280 वर्षांची परंपरा मोडीत निघणार; या कारणामुळे घडणार असे... 

तसेच उर्वरित विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यांना होमक्वारंटाइन न करण्याची उपाययोजना आरोग्य विभागाकडून केल्या जात आहे. या वेळी नांदगावखंडेश्‍वर येथील पोलिस निरीक्षक उदय सोयस्कर, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तहसीलदार परसराम भोसले, न. प. मुख्याधिकारी मीनाक्षी यादव, न. प. अध्यक्ष संजय पोफळे यांच्यासह आरोग्य विभाग, पोलिस विभाग व न. प. कर्मचारी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth commits suicide at detention center