यवतमाळमध्ये राष्ट्रवादीला धक्का; पदाधिकारी देणार राजीनामे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती बाबत कुठलीही माहिती तसेच निमत्रंण दिले नसल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधत राजीनामे देण्याचे तयारी दर्शविली आहे.

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आज (ता.24) दुसर्‍यांदा विश्राम भवन येथे मुलाखती सुरू आहेत. याबाबत कुठलीही माहिती तसेच निमत्रंण दिले नसल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधत राजीनामे देण्याचे तयारी दर्शविली आहे.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या आज (ता.24) निरीक्षक माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख तसेच संतोष कोरपे विश्राम भवन येथे मुलाखती घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यात दुसर्‍यांदा मुलाखती सुरू आहेत. विश्राम भवनातील या कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना कुठलीही माहिती दिली नाही.

मुलाखती असल्याबाबत जिल्हास्तरावरुन कोणतीही सूचना त्यांच्या पर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे पक्षात डावलल्या जात असल्याचा आरोप युवक काँग्रेस पदाधिकार्‍यांनी केला. याबाबत सर्व पदाधिकार्‍यांनी प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधत आपली नाराजी मांडली. सातत्याने डावलले जात असल्याने पदाचे राजीनामे देण्याची तयारीही रायुकॉच्या पदाधिकार्‍यांची आहे. याबाबत युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पकंज मुंदे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक धात्रक, नीलेश राऊत, संजय ढगले, राजू वनकर, शहराध्यक्ष साजिद शेख यांच्याशी संपर्क साधला असता सर्वांनी राजीनामाबाबत होकार दिला.

"प्रोटोकॉल नुसार युवक जिल्हाध्यक्षांना बोलविणे आवश्यक होते. मात्र, तसे झालेले दिसत नाही. याबाबत मी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना माहिती दिली. ते जिल्हाध्यक्षांशी बोलणार आहेत. कुणीही राजीनामे देणार नाही."
- मेहबुब शेख, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth congress officials to resign in Yavatmal