कारखान्याची इमारत पाहायला गेलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकाची मारहाण, तरुणाचा मृत्यू

सूरज पाटील
Tuesday, 1 December 2020

तरुणाला मारहाण झाल्याचा घटनाक्रम साखर कारखान्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी फुटेज आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यवतमाळ : साखर कारखान्याची इमारत पाहण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकाने फायबर काठीने मारहाण केली. यात त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.28) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मांगुळ साखर कारखाना येथे घडली.

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान, ३५ हजार मतदार...

शंकर मोहन आडे (वय 23, रा. सुकळी, ता. उमरखेड), असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी संशयित सुरक्षारक्षक शालिक कुमरे (वय 35, रा. मांगुळ कारखाना) याला ताब्यात घेतले. शंकर हा त्याचा मित्र पवन चव्हाण (वय 20,रा. पार्डी) याच्यासह साखर कारखान्याची इमारत पाहण्यासाठी गेला होता. कारखान्यात जाण्यास मनाई करीत सुरक्षा रक्षकाने तरुणाला फायबर काठीने पोटावर, छातीवर, पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पवन चव्हाण याने यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संशयित शालिक कुमरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करीत अटक केली. पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 

हेही वाचा - मेळघाट नव्हे 'मृत्यूघाट'; १९९३ पासून बाल-...

घटनाक्रम 'सीसीटीव्ही'त कैद -
तरुणाला मारहाण झाल्याचा घटनाक्रम साखर कारखान्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी फुटेज आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांनी कारखान्यात नेला. त्यामुळे तेथे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. ठाणेदार करेवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळ गाठून नातेवाइकांची समजूत काढली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth died in beaten by guard at mangul sugar factory in yavatmal