या युवकांच्या जिद्दीला सलाम; त्यांच्या धाडसत्राने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

डोंगरगाव येथील युवकांना वैनगंगा नदीलगत तब्बल 60 किलो मोहसडवा सापडला. सोबतच दारू गाळण्याचे साहित्यही सापडले. यवकांनी धाडसत्र राबवून हा सडवा नष्ट केला. त्यामुले दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

गडचिरोली : गावालगत वाहणाऱ्या वैनगंगा नदी काठालगत दारू गाळणाऱ्यांचा 60 किलो मोहसडवा डोंगरगाव येथील युवकांनी नष्ट केला. सोबतच दारूभट्ट्या आणि साहित्यही उद्‌ध्वस्त करण्यात आले. यावेळी नदीमार्गे 10 लिटर दारू घेऊन एकजण फरार झाला. युवकांच्या या कृतीने गावातील अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

वैनगंगा नदीलगत असलेल्या डोंगरगाव, येवली, मारकबोडी, शिवणी या गावांमध्ये काहीजण दारू गाळून त्याची आसपासच्या गावांमध्ये तसेच नदीमार्गे चंद्रपूर जिल्ह्यात विक्री करतात. डोंगरगाव येथील दारूविक्री थांबविण्यासाठी येथील युवकांनी पुढाकार घेत मुक्तिपथ तालुका चमूच्या मार्गदर्शनात संघटन तयार केले आहे.

 

संघटनेमार्फत गावांतील दारूविक्रेत्यांना नोटीस देत यापुढे दारू गाळून त्याची विक्री न करण्याच्या सूचना केल्या. गावातील 10 विक्रेत्यांनी दारू गाळणार नसल्याचे कबूल केले. काही जणांनी मात्र या नोटीस स्वीकारण्यास नकार दिला.

60 किलो मोहसडवा नष्ट

नदी काठालगत मोहाचे सडवे टाकल्याची माहिती युवकांना मिळाली. सोबतच काहीजण सकाळच्या वेळात दारू गाळत असल्याचेही युवकांना कळले. त्यांनी मुक्तिपथ तालुका चमूला याची माहिती दिली. सकाळी अहिंसक कृतीचे नियोजन करून तालुका संघटक अमोल वाकुडकर आणि उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी डोंगरगावला लागून नदीकाठालगत शोधमोहीम सुरू केली. यावेळी तब्बल 60 किलो मोहसडवा युवकांना सापडला. सोबतच दारू गाळण्याचे साहित्यही सापडले.

दारू विक्रेत्याने काढला पळ

हा सर्व साठा व साहित्य युवकांनी नष्ट केले. याच सुमारास एका विक्रेत्याची दारू गाळून झाली होती. युवकांना पाहून त्याने दारू घेऊन नावेच्या साहाय्याने पळ काढला. युवा संघटनेतील भूषण बोभाटे, अतुल रोहणकर, गौरव रोहणकर, जितेंद्र बोभाटे, पवन कोसरकर, अजय ठाकरे, आकाश मेश्राम, महेश गुरुनुले, राजेंद्र तुंकलवार, संजय कोसरकर, सारंग बोभाटे यांनी ही कारवाई केली.

जाणून घ्या : वधू चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याने वराने घेतला हा निर्णय...

संचारबंदीचा फायदा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्वत्र सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात असून या कामात पोलिस व्यस्त असल्याने याचा फायदा दारूविक्रेते घेत आहेत. लॉकडाउनमुळे बाहेर राज्यातून होणारा दारूचा पुरवठा कमी झाल्याने दारूतस्करांनी आता मोहफुलाच्या दारूकडे आपला मोर्चा वळवला आहे. गावालगतचे जंगल, नदी, नाल्याचा परिसर तसेच पडीक इमारतीचा दारू काढण्यासाठी वापर केला जात आहे. मात्र, गावागावातील मुक्तीपथ संघटनेचे कार्यकर्ते सक्रिय असून ते या प्रकारावर नजर ठेवून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The youth of Dongargaon destroyed 60 kg of Mohsadwa