esakal | यशोगाथा  : प्रत्येक घर करायचेय व्यसनमुक्त, याच ध्यासाने तरुणाची वेगळी वाट
sakal

बोलून बातमी शोधा

Youth struggle for deaddiction citizens of Gadchiroli district

खर्रा आणण्यासाठी पैसे आई-वडीलच देतात, ही बाब अधिक धक्कादायक होती. गडचिरोली जिल्ह्यातील गावागावांत व्यसनमुक्ती अभियान राबवून घरोघरी जागृती करण्याचे काम गणेश आणि त्यांच्या टीमने केले.

यशोगाथा  : प्रत्येक घर करायचेय व्यसनमुक्त, याच ध्यासाने तरुणाची वेगळी वाट

sakal_logo
By
अतुल मांगे

नागपूर  : व्यसन गडचिरोलीतील आदिवासींच्या रक्तात भिनले आहे. अशिक्षितपणा, दुर्गम भाग यामुळे व्यसनाचे दुष्परिणामच येथील नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढतच जाते. धक्कादायक म्हणजे लहान मुलेही या विळख्यात अडकत असलेले दिसून येते. नागरिकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे काम ‘मुक्तिपथ’ संस्था निरंतर करीत आहे. यामुळे जिल्ह्यातील चित्र बदलत असून, अनेक कुटुंब दारूपासून परावृत्त झाले आहेत. ‘मुक्तिपथ’च्या याच कार्यात गणेश कोळगिरे यांचा खारीचा वाटा आहे. आदिवासी कुटुंबातील महिला, लहान मुलांना व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्याचे गणेश यांचे कार्य अविरत सुरू आहे.

मूळ मराठवाड्यातील बीड येथील रहिवासी असलेल्या गणेश यांच्या घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती, अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन आयटी इंजिनिअर पदवी मिळवली. पुण्यातील एका खाजगी कंपनीत ते नोकरीवर होते. परंतु मनातील समाजकार्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपण ज्या विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले तेव्हा जे जे हात आपल्या मदतीसाठी धावून आले, तीच मदत आपणही इतरांना केली पाहिजे याच एका विचारातून त्यांचे समाजकार्य सुरू होते. हे करीत असताना ते निर्माणमध्ये दाखल झाले आणि येथून खऱ्या अर्थाने त्यांच्या समाजकार्याला सुरुवात झाली.

सविस्तर वाचा - हा स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न; खासदार नवनीत राणांवर गंभीर आरोप 
 

दारूमुळे कुटुंबाची कशी वाताहात होते. कर्ता पुरुष जर व्यसनाधीन असेल तर बायको आणि मुलांची कशी फरपड होते, हे जवळून अनुभवलेल्या गणेश यांनी ‘मुक्तिपथ’ हेच आपले कर्मक्षेत्र निश्चित केले. तेथे काम करताना गडचिरोली जिल्ह्यात व्यसन किती खोलवर रुजले आहे, हे त्यांच्या लक्षात आले. व्यसनमुक्तीचे काम करीत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शालेय मुले खर्रा खाऊसारखा खातात, विशेष म्हणजे हा खर्रा आणण्यासाठी पैसे आई-वडीलच देतात, ही बाब अधिक धक्कादायक होती. गडचिरोली जिल्ह्यातील गावागावांत व्यसनमुक्ती अभियान राबवून घरोघरी जागृती करण्याचे काम गणेश आणि त्यांच्या टीमने केले.

गणेश सध्या व्यसनाविरुद्धच्या मुक्तिपथ चळवळीत डेटा विश्लेषक म्हणून काम करीत आहे. जिल्ह्यातील दारूमुक्त आणि व्यसनी लोक, कुटुंबीयांची माहिती घेऊन त्यांचे सतत समुपदेशन करून सतत पाठपुरावा करण्याचे काम ते करीत आहेत. त्यांच्या या कामाला यश मिळत आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात शिक्षणाचा टक्का वाढत असून, मुक्तिपथच्या सततच्या प्रयत्नामुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील नवी पिढी शिकली पाहिजे यासाठी सर्वांकडूनच प्रयत्न केले जात आहेत, ज्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत.


व्यसनमुक्तींचा टक्का वाढतोय
सुरुवातीला मौज म्हणून प्यायली जाणारी दारू केव्हा आपल्यावर वरचढ होते हे कळतसुद्धा नाही. दारूचे व्यसन माणसाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहत नाही. व्यसनात आकंठ बुडालेल्यांना जीवनाचा नवा मार्ग दाखविण्याचे काम मुक्तिपथ करते. मुक्तिपथचे कार्य कठीण नसले तरी त्यात सातत्य असणे गरजेचे आहे. हेच सातत्य आमच्या टीममध्ये आहे. ज्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात व्यसनमुक्तींचा टक्का वाढत आहे. आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
गणेश कोळगिरे, सदस्य मुक्तिपथ, गडचिरोली