तरुणाई ‘सेल्फिटिसग्रस्त’

तरुणाई ‘सेल्फिटिसग्रस्त’

नागपूर - दिवसातून अनेकदा काढलेल्या ‘सेल्फी’ फोटोशॉपीच्या विविध ‘अप्लिकेशन्स’च्या माध्यमातून आकर्षक करून सोशल मीडियावर झळकावल्यानंतर ‘कमेंट’ची प्रतीक्षा करणारे अनेक तरुण, तरुणी असून नकळतपणे ‘सेल्फिटिस’ या मानसिक आजाराकडे वाटचाल करीत आहेत. सेल्फी काढताना होणारे मृत्यू तसेच ‘सोशल मीडिया’त टाकलेल्या ‘सेल्फी’वर नकारात्मक प्रतिक्रिया आल्यास नैराश्‍यातून आत्महत्येसारख्या घटनाही चिंतेचा विषय असून यावर नियंत्रणासाठी शहरातील तरुण सोशल मीडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी पोलिसांच्या सहकार्याने शाळा, महाविद्यालयांतून जनजागृतीचा वसा घेतला आहे. 

‘सेल्फी’ काढल्यानंतर विविध अप्लिकेशन्सचा वापर करीत आकर्षक फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅप चॅट आदी सोशल मीडियावर ‘सेल्फी’ टाकण्याचा अतिरेक होत असून अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने ‘सेल्फिटिस’ हा एक मानसिक आजार असल्याचे म्हटले आहे. २०११ ते २०१७ या काळात सेल्फी काढताना जगात २५९ मृत्यू झाले असून यातील १५९ मृत्यू भारतात झाल्याचा अहवाल अमेरिकेतील जर्नल ऑफ फॅमिली मेडिसीन ॲण्ड प्रायमरी केअर या संस्थेने जाहीर केला. यात तरुणींच्या तुलनेत तरुणांची संख्या अधिक आहे. दिवसातून दोन ते तीन सेल्फी काढणे, त्या पोस्ट केल्या नसतील तरीही हा प्रकार या आजाराच्या कक्षेत येत असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे. नागपूर जिल्ह्यातही गेल्या काही वर्षांत धरणात नावेत बसून सेल्फी काढताना तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतरही तरुणाई अशा घटनांपासून बोध न घेता आणखीच सेल्फीच्या मोहात पडत आहे. उंच पहाड, तलाव, धरणे, धबधबा, महामार्गावर ‘नो सेल्फी झोन’ तयार करण्याची गरज असून अशा ठिकाणी सेल्फी काढणाऱ्यांवर कारवाईच्या आवश्‍यकतेवर त्यांनी भर दिला. त्यांनी तरुणाईच्या बचावासाठी पोलिसांसोबत समन्वय साधून कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरांतून जनजागृतीस प्रारंभ केला आहे. शाळा, महाविद्यालय, झोपडपट्टी परिसरातही ते जनजागृती करीत आहेत. विशेष म्हणजे विविध प्रकारचे फोटो, कुठे आहोत, कुठे जात आहोत, याची माहिती ‘शेअर’ करून गुन्हेगारीलाही प्रोत्साहन मिळण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.  

आभासी जगात वावर  
‘सेल्फी’ काढल्यानंतर विविध ॲप्लिकेशन्सद्वारे फोटो अधिक आकर्षक करून तरुण-तरुणींमध्ये स्वतःची वास्तविकता लपविण्याचीही वेगळीच स्पर्धा आहे. एका आभासी जगात वावरण्याची सवयच त्यांना जडत असून कुटुंब व्यवस्थेला आणखी एक मोठा धोका निर्माण झाला. 

जिल्ह्यातील सेल्फीचे बळी 
 १६ नोव्हेंबर २०१६ रोजी शहरातील भगवानगर परिसरातील मनोज भुते या तरुणाचा रामटेक येथील गडमंदिरावर सेल्फी काढताना मृत्यू. 
 ५ नोव्हेंबर २०१७ रोजी बोर धरणात सेल्फी काढताना पंकज गायकवाड, निखिल काळबांडे या तरुणांचा मृत्यू. 

विविध सेल्फी किंवा पोस्ट टाकून तरुण, तरुणींनी स्वतःवरच टीका, टिप्पणी करण्यासाठी इतरांना दालन उपलब्ध करून दिले आहे. अनेकदा या पोस्ट ‘ट्रोल’ केल्या जातात. अर्थात, एकामागे एक नकारात्मक प्रतिक्रियातून तरुण, तरुणी लवकरच नैराश्‍यात जातात. यातून आत्महत्येसारखे विचारही मनात डोकावतात. त्यामुळेच आतापासूनच यावर आवर घालणे आवश्‍यक आहे. 
- अजित पारसे, सोशल मीडिया विश्‍लेषक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com