जिल्हा परिषदेचे शेतकरी प्रेम फक्त देखावाच!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

जिल्हा परिषदेचे शेतकरी प्रेम फक्त देखावाच!
नागपूर : शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात फक्त बैठकाच घेतल्या जात आहेत. दुसरीकडे संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव घेऊनही तो अद्याप सरकारकडे पाठविण्यात आला नाही. विशेष म्हणजे या संदर्भात एकाही सत्ताधाऱ्याने पाठपुरावा केलेला नाही. त्यावरून जिल्हा परिषदेचे शेतकऱ्यांवरचे प्रेम फक्त देखावा असल्याची टीका होत आहे.

संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळीस्थिती आहे. राज्य शासनाने मात्र काटोल, नरखेड, कळमेश्‍वर हे तीन तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले. यासोबत पाच तालुक्‍यांतील आठ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 14 नोव्हेंबरला झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत या मुद्यावर वादळी चर्चा झाली. चुकीच्या निकषाच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, शासनाने भेदभाव केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. सभेत सर्वच सदस्यांनी आपल्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा मुद्दा मांडला. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातचा ठराव एक मताने घेण्यात आला. हा ठराव घेऊन आज 15 दिवसांचा काळ लोटला आहे. मात्र, अद्याप हा ठराव शासनाकडे पाठविण्यात आला नसल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठराव पाठविण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून सभेचे प्रोसेडिंगच तयार करण्यात आले नसल्याने ठराव शासनाकडे पाठविण्यात आला नसल्याचे कृषी विभागातील सूत्रांकडून समजते. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यावरूनही सामान्य प्रशासन आणि कृषी विभागात मतभेद असल्याचे समोर आले आहे. अध्यक्षा निशा सावरकर आणि पदाधिकाऱ्यांनी स्थायी समितीची बैठक पेंचच्या पाटबंधारे विभागातील विश्रामगृहात घेतली. शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी बैठक पेंचमध्ये घेण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, दुष्काळाचा ठराव शासनाकडे पाठविण्याबाबत साधी माहितीही घेण्यात आली नाही. ठराव घेतल्याने आपले काम झाले, असेच काहीसे सत्ताधाऱ्यांचे असल्याचे दिसते.

प्रथम प्रोसेडिंग तयार करून ठराव शासनाकडे पाठवायला हवा होता. फक्त ठराव घेऊन मोकळे झाले. कुठलाही पाठपुरावा केला नाही. यांना शेतकऱ्यांचे हित जोपासायचे नाही. फक्त देखावा करण्यात येत आहे.
- मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते.

Web Title: zp news