‘त्‍या’ कर्मचाऱ्यांना भोवणार विदेशवारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नागपूर  - विनापरवानगी विदेशवारीला जाणे कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडणार  असून, याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी  दिली. 

नागपूर  - विनापरवानगी विदेशवारीला जाणे कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडणार  असून, याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी  दिली. 

जिल्हा परिषदेतील २० ते २५ कर्मचारी, अधिकारी बॅंकॉक येथे सहलीसाठी गेल्याची माहिती पुढे आली. त्यात बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारीवर्गचा अधिक सहभाग आहे. त्यांच्यासोबत वित्त विभाग, पंचायत आणि इतर विभागातील कर्मचारीही सहलीला गेले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी, अकाउंटंट, इंजिनिअर यांच्यासह चपराशाचा समावेश असल्याची धक्‍कादायक बाब उघडकीस आली. सहलीला गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती फारशी बरी नाही. आर्थिक स्थिती उत्तम नसताना विदेशवारीला गेल्याने आश्‍वर्य व्यक्‍त केले जात आहे. यामुळे जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यांच्यासोबत एक कंत्राटदारही आहे. या कंत्राटराच्या आर्थिक मदतीनेच सर्वांना विदेशवारी घडल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. नियमानुसार विदेशवारीला जाताना त्याची माहिती प्रशासनाला देणे आवश्‍यक आहे. 

सुटीचा अर्ज करताना त्यात ती माहिती देणे गरजेचे आहे. मात्र, अनेक  अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याची माहितीच दिली नसल्याचे खुद्द उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी स्पष्ट केले. यामुळेच प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याचे सूत्रांकडून समजते. माहिती दडविणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून योग्य स्पष्टीकरण न आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही समजते.

Web Title: zp officer and employee foreign tour issue