झेडपीचे विद्यार्थी झळकले कॅलेंडरवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

नागपूर - कॅलेंडरवर कुठलेही नैसर्गिक दृश्‍य किंवा अभिनेत्रीचे छायाचित्र छापण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्रे आणि साकारलेली चित्र छापायची. ज्या विद्यार्थ्यांनी ती लिहिली आहेत त्यांची नावे त्यावर लिहून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची कॅलेंडरच्या माध्यमातून ब्रॅण्डिंग करण्याची संकल्पना जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी साकारली आहे.

स्वच्छतेचा संदेश गावागावांत पोहोचविण्यासाठी आणि "प्रत्येक घरी शौचालय' मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाच बॅण्ड ऍम्बेसिडर केले. अलीकडच्या फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ई-मेलच्या युगात पत्र पाठविण्याचा कल कमी झाला आहे. मोबाईलवरून त्वरित दूरवर असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधता येत असल्याने पत्र लिहिण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. त्यामुळे पत्र लेखनापासून शाळांमधील विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. पत्र लेखनाची सवय विद्यार्थ्यांना लावण्यासाठी सीईओ बलकवडे यांनी "एक पत्र सीईओला' हा उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. चौथी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सीईओंना पत्र लिहून त्यांच्या गावातील, परिसरातील समस्या मांडल्या. जिल्ह्यात शंभर टक्के शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी याच विद्यार्थ्यांची मदत घेतली.

ज्या विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नसेल ते त्यांच्या पालकांकडे शौचालय बांधण्याचा आग्रह धरून तो पूर्ण करून घेतील. त्या विद्यार्थिनींना "एक दिवस सीईओ'सोबत घालविण्याची संधी देण्याचा उपक्रम राबविला. जिल्हा परिषद शाळांमधील 40 विद्यार्थिनींनी प्रथमच जिल्हा परिषदेला भेट देऊन तेथील कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पुढे हेच विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या कॅलेंडरवर झळकतील, अशी कल्पना कोणी केली नव्हती. सीईओ बलकवडे यांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेली स्वच्छताविषयक पत्रे आणि काढलेली चित्र कॅलेंडरवर छापून खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांना ब्रॅण्ड ऍम्बेसिडर केले. सध्या हे कॅलेंडर सर्व जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील सर्व विभागात लागले आहेत.

Web Title: zp student on calender