Fact Check : पंतप्रधानांवर टीका करतानाचा गडकरींचा 'तो' व्हिडिओ 12 वर्षे जुना; खोट्या दाव्यासह पुन्हा होतोय शेअर

Nitin Gadkari Viral Video : देशाच्या 18व्या लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान हे 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा व्हायरल व्हिडिओ शेअर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे.
Nitin Gadkari Viral Video Fact Check
Nitin Gadkari Viral Video Fact CheckeSakal

Created by : पीटीआय

Translated By : सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सुमारे 2 मिनिट 13 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये गडकरी हे केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर टीका करताना दिसत आहेत. गडकरी यामध्ये पंतप्रधान मोदींबद्दल बोलत असल्याचा दावा हा व्हिडिओ शेअर करणारे करत आहेत.

पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर, हा दावा खोटा असल्याचं सिद्ध झालं. हा व्हिडिओ आताचा नसून, 2011 सालच्या ऑगस्ट महिन्यातील असल्याचं स्पष्ट झालं आहे. या व्हिडिओमध्ये गडकरी हे खरंतर तत्कालीन काँग्रेस सरकार आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करत होते.

देशाच्या 18व्या लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान हे 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा व्हायरल व्हिडिओ शेअर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे.

दावा :

फेसबुक यूजर Pinku Chaudhary ने 12 एप्रिल रोजी हा व्हायरल व्हिडिओ पोस्ट केला. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं, "मित्रांनो, गडकरीजींचं बोलणं नक्की ऐका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. धन्यवाद गडकरी सर! भारताच्या नागरिकांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. संविधानाला नष्ट करणारे पंतप्रधान हुकूमशाही आणण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. हे दोन लोक जे देशातील गरीबांना विकत आहेत, ते देशाचं काय करतील? त्यांना पाण्यात मराठी लोक दिसत आहेत. गडकरी साहेबांनी हे चांगलंच ओळखलंय. योग्य वेळी संविधान आणि लोकशाहीची बाजू घेतल्याबद्दल गडकरींचे मनापासून आभार. लोकशाहीमध्ये सत्तेचं परिवर्तन गरजेचं आहे, अन्यथा नेते हुकूमशाहीचे समर्थक होतात. आता अंधभक्तांनो, तुम्हीही डोळे उघडा आणि समजूतदार व्हा. या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा आणि लोकांना सत्य सांगा. रावणाच्या लंकेतील बिभीषण झाले गडकरी"

या पोस्टची लिंक, अर्काइव्ह लिंक आणि पोस्टचा स्क्रीनशॉट तुम्ही येथे पाहू शकता.

Screengrab of Viral FB Post
Screengrab of Viral FB PosteSakal

यासोबतच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर INDIA Jeetega नावाच्या प्रोफाईलने देखील हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. "भाजपचे नेते नितीन गडकरीचं पहिल्यांदा लोकशाहीच्या समर्थनार्थ मोदींच्या विरोधात वक्तव्य. आपल्या देशाला अशाच कठोर नेत्यांची गरज आहे. समाजवादी विचारधारेचे व्यक्ती कोणत्याही पक्षात असले, तरी त्यांचं समर्थन करायला हवं. हा व्हिडिओ पाहून तर अंधभक्तांची जळली असणार, खरं ना?" असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टची लिंक, अर्काइव्ह लिंक आणि पोस्टचा स्क्रीनशॉट तुम्ही येथे पाहू शकता.

X Post Screengrab
X Post Screengrab

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशाच प्रकारच्या दाव्यांसह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. इथे आणि इथे क्लिक करून तुम्ही या पोस्ट पाहू शकता.

तपासणी :

व्हायरल दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी पीटीआयच्या फॅक्ट चेक डेस्कने त्याची तपासणी केली. या व्हिडिओमध्ये गडकरींसोबत भाजप नेते रविशंकर प्रसादही दिसत आहेत. व्हिडिओमध्ये उजव्या बाजूला भाजपचा झेंडाही दिसत आहे. गडकरींच्या बोलण्यात काँग्रेस, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, भ्रष्टाचार, अण्णा आंदोलन असे शब्द वापरत आहेत.

पुढे पीटीआयने InVID टूलच्या मदतीने या व्हिडिओतील की-फ्रेम्स काढले, आणि गुगल लेन्सच्या मदतीने त्यांना सर्च केलं. यानंतर हा ओरिजिनल पूर्ण 4 मिनिटे 25 सेकंदांचा व्हिडिओ भाजपच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर मिळाला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "अण्णा हजारे आणि पंतप्रधान : 15.08.2011" असं लिहिलं आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकाल.

YouTube Video Screengrab
YouTube Video Screengrab

इंडियन एक्स्प्रेस, टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनावर कित्येक अटी लागू केल्या होत्या. यानंतर भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी हे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला होता. इथे आणि इथे क्लिक करून तुम्ही हे रिपोर्ट वाचू शकता.

Indian Express Screengrab
Indian Express ScreengrabeSakal

यातूनच हे स्पष्ट होत आहे, की हा व्हिडिओ सुमारे 12 वर्षे जुना आहे. गडकरींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टीका यूजर्स आता पंतप्रधान मोदींच्या नावाने खोटा दावा करुन व्हायरल करत आहेत.

निष्कर्ष :

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोदी सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केल्याचा दावा एका व्हायरल व्हिडिओच्या मदतीने केला जात होता. मात्र, पीटीआय फॅक्ट चेक टीमच्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा व्हिडिओ 12 वर्षे जुना असून, गडकरींनी खरंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या काँग्रेस सरकारवर टीका केली होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

'पीटीआय' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com