esakal | यंदा प्रदूषणमुक्त वारी
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा प्रदूषणमुक्त वारी

यंदा प्रदूषणमुक्त वारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पालखी मार्गावर करणार वृक्षारोपण, बीजारोपण
आळंदी - आषाढी वारीनिमित्त यंदा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पालखी मार्गावर वृक्षारोपण आणि बीजारोपण केले जाणार आहे. हरित वारी आणि निर्मल वारी यासाठी देवस्थान आग्रही असून, प्रदूषणमुक्त वारीचा संकल्प आहे. मंदिर आणि पालखी मार्गावर भाविकांना सोयी देण्याबरोबर सुरक्षितता पुरविण्यासाठी जादा पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा विकसित केली असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे पालखी सोहळाप्रमुख डॉ. अजित कुलकर्णी यांनी दिली.

कुलकर्णी यांनी सांगितले, की यंदा पालखी मार्गावर वारकऱ्यांना निवारा आणि निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आणि बीजारोपण केले जाणार आहे. ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याशिवाय आळंदीसह पालखी मार्गावर ठिकठिकाणी थर्माकोल पत्रावळ्या आणि प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन वेळोवेळी देवस्थानकडून वारकरी संप्रदायाच्या बैठकीत केले जात आहे. हरित वारी आणि निर्मल वारीसाठी सरकारबरोबरच वारकरी आणि देवस्थानही तयारीत आहे. 

आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले, की पालखी सोहळ्यासाठी माउलींच्या चांदीच्या रथाची किरकोळ दुरुस्ती आणि पॉलिशचे काम पूर्ण झाले आहे. माउलींच्या पादुका आणि पूजेसाठीच्या चांदीच्या भांड्यांना उजाळा देण्याचे काम सुरू आहे. चांदीची अब्दागिरी, कर्णा, त्याचबरोबर सोहळ्यासाठी लागणारा किराणा मालही देवस्थानने जमा केला आहे. 

पालखी प्रस्थानासाठी दर्शनबारीचे काम पूर्ण झाले असून, भाविकांची संख्या वाढल्यास दर्शनबारी भक्ती सोपान पुलावरून नदीपलीकडे फिरविण्यात येणार आहे. पावसामुळे इंद्रायणीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास दर्शनबारी भक्ती सोपान पुलावर न नेता, शनी मंदिरमार्गे वाहनतळाच्या जागेत फिरविण्यात येणार आहे. याशिवाय मंदिराच्या मागील बाजूस नव्याने दर्शनमंडप उभारला असून, त्या ठिकाणी प्रस्थान काळात आणि प्रस्थानानंतर पालखी आजोळघरी आल्यावर भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. मंदिर आणि महाद्वारात सुमारे ९६ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. याशिवाय देवस्थानचे स्वतःचे सुरक्षा गार्ड आणि संपर्कासाठी २४ वॉकीटॉकी सज्ज आहेत. प्रस्थान काळात मंदिर आणि महाद्वारात पोलिसांचा जादा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

प्रस्थानाच्या दिवशी दुपारी एकनंतर मानाच्या दिंड्या आत घेण्यात येणार असल्याने देऊळवाड्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. पालखी मार्गावर सवलतीच्या दरात ज्ञानेश्वरी विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. याशिवाय पालखी तळ आणि गावात स्वच्छता राहावी, यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे. यात्रा काळात भाविकांना माउली बाग आणि मंदिराबाहेर पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय केली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पालखी मार्गावर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पाचशे फिरती शौचालये उभारली जाणार असल्याचे वीर यांनी सांगितले.