आळंदीत वारकऱ्यांचे आगमन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 June 2017

आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांचे आगमन होऊ लागले आहे. दरम्यान, ऊन-सावल्यांच्या खेळात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी वरुणराजाही दुपारनंतर बरसल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.

आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांचे आगमन होऊ लागले आहे. दरम्यान, ऊन-सावल्यांच्या खेळात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी वरुणराजाही दुपारनंतर बरसल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.

माउलींच्या पालखीचे प्रस्थान १७ जूनला परंपरेप्रमाणे आळंदीतून पंढरीच्या दिशेने होणार आहे. शहरात सकाळपासूनच वारकऱ्यांची गर्दी होऊ लागली. मंदिरात, इंद्रायणी तीरी, गोपाळपुरा आणि सिद्धबेट येथील दर्शनासाठी वारकरी गर्दी करत होते. माउलींच्या समाधीवर महापूजेसाठी भाविकांची गर्दी होती. राज्यभरातून भाविकांचा ओघ आळंदीच्या दिशेने सुरू आहे. ठिकठिकाणी धर्मशाळांमधून भाविक मुक्काम करत आहेत. 

दरम्यान आळंदीत वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पालिकेने रस्त्यातील खड्डे भरून घेतले. प्रदक्षिणा रस्त्यावर डांबरीकरण केले. तर जिल्हा परिषेदेच्या वतीने फिरते शौचालये सुमारे पाचशेहून अधिक बसविल्याने यंदाची वारी निर्मल वारी ठरणार आहे. स्वच्छतेला अधिक महत्त्व देण्यासाठी पालिकेतर्फे ठेकेदारामार्फत जादाचे कर्मचारी नेमले आहेत. शहर स्वच्छतेचे काम सुरू आहे.  याचबरोबर सुरक्षिततेसाठी पालिकेच्या वतीने प्रमुख चौकांतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत.

याचबरोबर देवस्थानची तयारी पूर्ण झाली. वारीसाठी देवपूजेची चांदीची भांडी, चांदीचा रथ सज्ज ठेवण्यात आला आहे. याशिवाय पालखी सोहळ्यासाठी बत्तीस दिवस लागणाऱ्या जेवणाच्या शिध्यासह अब्दागिरी, पालखी वारीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. दिंडीकऱ्यांचे प्रस्थानसाठीचे पासेस वाटपाचे काम सुरू आहे. पालिका आणि देवस्थान वारीसाठी सज्ज झाले आहे. 

पोलिस अधीक्षकांनी घेतली माहिती
आळंदीत वारीसाठी राज्यभरातून जादाचा पोलिस बंदोबस्त काल रात्रीच दाखल झाला. आज सकाळी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तावरील पोलिसांची हजेरी आणि बंदोबस्त वाटप करण्यात आला. हक यांनी वारीतील तयारी आणि प्रस्थानाच्या कार्यक्रमाची माहिती घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alandi pune news warkari coming in alandi