
सासवडनगरीत हरिनामाचा गजर
सासवड : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळावर दिंड्यांमधून लाखो वारकऱ्यांच्या हरिनामाच्या साथीत सुरू असलेल्या टाळ-मृदंगाच्या अखंड गजरात अवघी सासवडनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. दरम्यान, संत सोपानदेव यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला माउलींच्या सोहळ्यातील वारकऱ्यांनी हजेरी लावली. माउलींच्या दर्शनासाठी पुरंदर पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सासवडमध्ये आज द्वादशी असल्याने सकाळपासून दिंड्यांमध्ये उपवास सोडण्यासाठी पंगती पडल्या होत्या. वारकऱ्यांसाठी स्थानिक मंडळी गोड मिष्टान्नांचे जेवणावळी, अन्नदानाचे उपक्रम राबविताना दिसत होते.
दोन दिवस पालखीचा मुक्काम असल्याने सासवडनगरीतील नागरिक व भाविकांनी तळावर दर्शनासाठी गर्दी केली होती. शहराला जत्रेचे स्वरूप झाले होते. दरम्यान, संत सोपानदेव यांच्या पालखीचे सासवडनगरीतून पंढरीच्या दिशेने दुपारी प्रस्थान झाले. त्या सोहळ्यात माउलींच्या सोहळ्यातील वारकरी सहभागी झाले होते. पुणे ते सासवड हा मोठा टप्पा वाटचाल केल्याने आज वारकऱ्यांनी तळावर विश्रांती घेणे पसंत केले. पालखी तळावरील ओपन जीमच्या साहित्याचा वारकऱ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. दुपारनंतर भजन, कीर्तनाचा आनंद पालखी तळावर घेताना वारकरी दिसत होते.
दोन वर्षांनी पुन्हा वारी अनुभवायला मिळाली. यंदाच्या वारीची वाटच पाहत होतो. मात्र, कोरोना कमी झाल्याने वारकऱ्यांचा सहवास, भजनाचा वारीच्या रूपाने आनंद मिळाला. वारीतून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे जीवनातील सर्व प्रश्न सुटण्यास बळ मिळते.
- यमुनाबाई चव्हाण, केसापुरी, परभणी
Web Title: Ashadi Wari 2022 Palkhi Of Saint Dnyaneshwar Maharaj In Saswad Devotee Crowd In Purandar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..