#saathchal "ज्ञानोबा.. तुकाराम"..च्या गजरात श्रीक्षेत्र देवगड दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

सुनील गर्जे
Friday, 6 July 2018

प्रारंभी गुरुवर्य हभप भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रय मूर्ती, श्रीसमर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पालखीमधील प्राकृत चांदीच्या पादुकांचे वेदमंत्राच्या जयघोषात विधिवत पूजन करण्यात आले.

नेवासे : भागवत धर्माच्या भागव्या पताका खांद्यावर घेऊन दीड हजार वारकरी, अश्व, टाळ-मृदंग आणि ज्ञानोबा... तुकाराम.. दिगंबरा.. दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. असा गजर करीत राज्यात शिस्तबध्द म्हणून लौकिक असलेल्या श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासे) दिंडीचे गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (ता. 6) रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरकरीता मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. यावेळी भक्तीला उधाण आले होते. श्रीक्षेत्र देवगड संस्थानच्या सदगुरु किसनगिरी बाबांच्या पायी पंढरपूर वारीचे हे 44 वे वर्ष आहे.

प्रारंभी गुरुवर्य हभप भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रय मूर्ती, श्रीसमर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पालखीमधील प्राकृत चांदीच्या पादुकांचे वेदमंत्राच्या जयघोषात विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले, माणसाने माणसाशी चांगले वागावे, माणुसकीचे नाते जोपासून एकमेकांमधील विठ्ठल शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. यावेळी  खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार शंकरराव गडाख, भाजपनेते विजय पुराणिक, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार बाळासाहेब मुरकुटे, प्रसिद्ध गायक बजरंग विधाते, तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर, पोलिस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांनी दिंडी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. 

देवगड फाटा येथे दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी औरंगाबाद युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष माने, राम विधाते, विठ्ठल लंघे, कडुबाळ कर्डीले, सरपंच अमिन पठाण, पंढरीनाथ जाधव, बाळू महाराज कानडे, अजय साबळे, भाऊसाहेब पाठक उपस्थित होते. दरम्यान दिंडीचे देवगड, मुरमे, बकुपिंपळगाव, देवगड फाटा व खडका फाटा येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. 

विद्यार्थ्यांकडून स्वागत व शिस्तबद्धता  

दिंडी प्रस्थान प्रसंगी देवगड येथील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देवगड संस्थान मुख्यद्वार ते मुख्य कामानिपर्यंत केलेले दिंडीच्या स्वागतासह अग्रभागी असणारे अश्व, बँण्डपथक, झांज पथक, अग्रभागी पांढराशुभ्र पोशाखातील झेंडेकरी, पुष्पांनी सजविलेली पालखी वाहन, भजनी मंडळ, त्यामागे दिंडीत सहभागी वारकरी भाविक, डोक्यावर तुलसी कलश असलेल्या महिला भाविक यांची शिस्तबद्धता लक्षवेधून घेत होते.

श्रीक्षेत्र देवगड दिंडीत...  

▪एकूण वारकरी : 1500. ▪महिला : 400.  ▪पुरुष : 1100.  ▪अश्व : 06.  ▪वाहने : 25. ▪एकूण अंतर : 275 किमी.  ▪मुक्काम : 15


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Chanting of Dnyanoba Tukaram Palakhi begins