आषाढी २०२० : लाखो वारकऱ्यांच्या संख्येनी गजबजणारी पंढरी यंदा सुनी सुनी

अभय जोशी
Tuesday, 30 June 2020

आषाढी यात्रेच्या सोहळ्यामुळे दरवर्षी आज आषाढी दशमी दिवशी पंढरपुरात दहा लाखांहून अधिक भाविक येतात. त्यामुळे दरवर्षी दशमी दिवशी पंढरपुरात अक्षरश भक्तीचा महापूर आलेला असतो.

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेच्या सोहळ्यामुळे दरवर्षी आज आषाढी दशमी दिवशी पंढरपुरात दहा लाखांहून अधिक भाविक येतात. त्यामुळे दरवर्षी दशमी दिवशी पंढरपुरात अक्षरश भक्तीचा महापूर आलेला असतो. परंतु यंदा मात्र कोरोनामुळे वारकऱ्यांना पंढरपूरला येण्यास मज्जाव करण्यात आला असल्याने संपूर्ण पंढरपूर शांत आणि सुनेसुने आहे. त्यातच आज दुपारी 2 पासून संचारबंदी लागू करण्यात आली असल्यामुळे सर्व रस्त्यांवर नीरव शांतता आहे.
दरवर्षी आषाढी यात्रे साठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्यासह लाखो भाविका सह लाखो भाविक पंढरपुरात येतात. मजल- दरमजल करत आषाढी दशमी दिवशी या सर्व पालख्या पंढरपुरात पोहोचतात असतात. टाळ- मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष यामुळे अवघी पंढरी भक्तीरसात चिंब होत असते. जिकडे पहावे तिकडे कपाळी गंध आणि हाती भगवी पताका घेतलेले वारकरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर करत तल्लीन झालेले असतात. शहरातील विविध मठ आणि धर्मशाळा मधून कीर्तन प्रवचनात भाविक देहभान विसरून रंगून जातात.
शेकडो वर्षाच्या या पंढरपूरच्या वारीच्या परंपरेत यंदा कोरोनामुळे विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. संसर्ग वाढू नये यासाठी 17 मार्चपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलेली आहे. आषाढी यात्रेसाठी कोणीही भाविकांनी पंढरपूर येऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर तसेच पंढरपूर शहराच्या बाहेर ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. परगावाहून येणाऱ्या कोणालाही शासनाच्या अधिकृत पास शिवाय प्रवेश दिला जात नाहीये. कडेकोट पोलिस बंदोबस्त असला तरीदेखील दक्षता म्हणून पंढरपुरात ठिकाणी आणि तात्पुरते संरक्षक कठडे उभा करून रस्ते बंद करण्यात आले आहेत. चंद्रभागा नदीच्या तीरावरील उद्धव घाट आणि चंद्रभागा घाट वगळता अन्य सर्व घाट देखील तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाने आज दुपारी 2 पासून पंढरपूर शहर आणि लगतच्या गावांमध्ये संचारबंदी पुकारली आहे. त्यामुळे आज सकाळपासून पंढरपूर शहरातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. दरम्यान आज सायंकाळी शासनाने परवानगी दिलेल्या संतांच्या पालख्यांचे पंढरपुरात एसटी बस मधून आगमन होणार आहे. त्यामुळे संबंधित मठाच्या ठिकाणी फुलांनी सजावट केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus bans Warakaris from entering Pandharpur