esakal | सीसीटीव्हींची ‘नजर’
sakal

बोलून बातमी शोधा

सीसीटीव्हींची ‘नजर’

सीसीटीव्हींची ‘नजर’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तुकाराम महाराज संस्थानचा सुरक्षेवर भर 
देहू - आषाढी वारीसाठी जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या १६ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी सुरू केली आहे. मुख्य देऊळवाड्यात गाथा पूजन करून दिंडी सप्ताहाला सुरवात झाली आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संस्थानने मुख्य देऊळवाड्याबाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध भागांतील दिंड्याही देहूकडे निघाल्या असल्याचे संस्थानतर्फे सांगण्यात आले. तसेच, संपूर्ण सोहळ्यात भाविकांचे श्रद्धास्थान असलेला संत तुकाराम महाराजांचा चांदीचा रथ देहूत दाखल झाला आहे, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख अभिजित मोरे, सुनील दि. मोरे, जालिंदर मोरे यांनी दिली. या वेळी संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे उपस्थित होते.

पालखी सोहळाप्रमुख सुनील महाराज मोरे यांनी सांगितले की, रथाचे काम खडकी येथील फॅक्‍टरीत पूर्ण झाले आहे. यंदा रथावरील जनरेटरची जागा बदलली आहे. रथाच्या खालच्या बाजूला जनरेटर बसविले आहे. तसेच वारीमध्ये रथावरील गर्दी कमी करण्यात येणार आहे. भाविकांना पालखी मार्गावर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन व्यवस्थित घेता यावे, यासाठी खास सोय केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने रथावर चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सोहळ्यात ३३६ दिंड्या सहभागी होणार आहेत. भाविकांना पालखी मार्गावर विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरकारच्या पाणी, आरोग्य, वीज, रस्ते विभागाला पत्रव्यवहार केला आहे. त्याचप्रमाणे पालखी मार्गावर निवाऱ्यासाठी तंबूंची व्यवस्था केली आहे. 

पालखी मार्गावरील अन्नदानासाठी लागणारे साहित्य खरेदी केलेले आहे.
टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजा साहित्याची खरेदी केली आहे. मानकरी, सेवेकरी, दिंडी प्रमुखांना पत्रव्यवहार केला आहे.

देऊळवाड्यातील स्वच्छतेसाठी ५० कर्मचारी नियुक्त केले असून सहा सुरक्षारक्षकही तैनात आहेत. महाद्वारातून पालखी प्रस्थानाच्या दिवशी दिंड्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तपोनिधी नारायण महाराज द्वारातून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. देऊळवाड्यात १६ तर, वैकुंठ गमनस्थान मंदिर परिसरात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मंदिराला फुलांची सजावट केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अब्दागिरी, गरुडटक्के यांना पॉलिश करण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्यासाठी संस्थानतर्फे गाथा उपलब्ध आहेत. मंदिराची रंगरंगोटी पूर्ण झाली असून, त्यावर रोषणाई केली आहे. तसेच, पालखीमार्गावरील अनगडशाहबाबा मंदिराजवळील मेघडंबरीची रंगरंगोटी केली आहे. दरम्यान, देऊळवाड्यात आज पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांनी पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ, पालखी, अब्दागिरी, गरुडटक्के, पादुकांना पॉलिश केले. तसेच देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील चांदीला चकाकी आणली.