esakal | देऊळवाड्यात कडक सुरक्षा व्यवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

देऊळवाड्यात कडक सुरक्षा व्यवस्था

देऊळवाड्यात कडक सुरक्षा व्यवस्था

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांची माहिती; ठिकठिकाणी टेहळणी नाके

देहू - संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने देहूतील मुख्य देऊळवाड्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. प्रस्थानाच्या वेळी देऊळवाड्यातील भजनी मंडपात गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती देहूरोडचे पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांनी दिली. 

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १६ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्या संदर्भाच्या बंदोबस्ताबाबत देहूरोडचे पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांनी सांगितले की, संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाडा, वैकुंठ गमनस्थान मंदिर, गावाचे प्रवेशद्वार आणि देहूरोड येथील कमान येथे टेहेळणी नाके उभारले आहेत. देऊळवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातील धातुशोधक यंत्र सुरू करण्याची विनंती संस्थानला केली आहे. भाविकांच्या वाहनांसाठी गावाबाहेर वाहनतळ केले जाणार आहे.

बंदोबस्तासाठी पोलिसांचे विशेष भरारी पथक तैनात आहे. तसेच, एक उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक, ३० फौजदार, महिला पोलिस अधिकारी, २५ कर्मचारी, वाहतूक नियंत्रक पोलिस, होमगार्ड नियुक्त केले आहेत. विविध संस्था आणि कंपनीतील शंभर स्वयंसेवकही बंदोबस्तासाठी आहेत. पालखी सोहळ्यात श्‍वान व बाँब शोधक व नाशक पथक असेल.

वाहनांवर निगराणी ठेवण्यासाठी फिरते कॅमेरे लावले जाणार आहेत. इंद्रायणी नदीकिनारी जीवसुरक्षा रक्षक तैनात आहेत. फ्लड लाइट बसविली आहे. दिंडीतील वाहनांच्या चाकात जागेवरच हवा भरण्याचे यंत्रही उपलब्ध असेल. पालखी रथामागे व पुढे चोख बंदोबस्त असेल. दोन रुग्णवाहिका, अग्निशामक पथक असेल. स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर व्यवस्थितपणे हाताळण्याची सूचना हॉटेल व्यावसायिकांना केली आहे. 

वाहतूक मार्गात बदल
पालखी सोहळ्यानिमित्त देहूतील वाहतूक व्यवस्थेत बदल केलेला आहे. पालखी प्रस्थानाच्या दिवशी म्हणजे १६ जूनला गावात अवजड वाहनांना बंदी. १७ जूनला पालखी देहूतून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल, तेव्हा देहूरोड ते निगडीपर्यंत वाहतूक बंद असेल. पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते देहूरोड दरम्यान वाहतूक बंद असेल. निगडीहून मुंबईकडे जाणारी वाहतूक रावेतमार्गे वळवली जाईल. मुंबईकडून पुणे, पिंपरी-चिंचवडकडे येणारी वाहतूक देहूरोड पोलिस ठाण्याजवळील कात्रज बाह्यवळण मार्गाने वळविण्यात येईल. चाकण- तळेगाव मार्गावरील वाहनांना देहूत प्रवेश बंदी असेल.