esakal | देहूच्या भजनी मंडपात पासधारकांनाच प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

देहूच्या भजनी मंडपात पासधारकांनाच प्रवेश

देहूच्या भजनी मंडपात पासधारकांनाच प्रवेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देहू - येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा शुक्रवारी (ता. १६) दुपारी आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, दिंडीतील विणेकरी आणि संस्थानने दिलेल्या पासधारकांनाच भजनी मंडपात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष
बाळासाहेब मोरे, पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे, सुनील मोरे, जालिंदर मोरे यांनी दिली. या निर्णयामुळे मुख्य प्रस्थान सोहळ्यादरम्यान भजनी मंडपात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण राहणार असून प्रस्थान सोहळा सर्वांना अनुभवता येणार आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपअधीक्षक जी. एस. माडगूळकर यांनी पालखी सोहळा प्रमुखांबरोबर मंदिराची पाहणी केली. त्या वेळी सुरक्षिततेसाठी विविध सूचना केल्या. त्यानुसार मुख्य प्रस्थान सोहळा कार्यक्रमाच्या वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पासधारकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी सांगितले की, मुख्य देऊळवाड्यात परंपरेनुसार दिंड्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर भजनी मंडपात विणेकरी, मुख्य अतिथी आणि पासधारकांनाच प्रवेश देण्यात येईल. पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांनी सांगितले की, संस्थानतर्फे पास देण्यात येतील. भजनी मंडपात केवळ पासधारकांनाच प्रवेश देण्यात येईल; तसेच विणेकरी, प्रमुख पाहुण्यांना प्रवेश देण्यात येईल.