तुकोबारायांच्या पालखीला देहूकरांचा निरोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

देहू - टाळ- मृदंगांचा गजर आणि ‘तुकाराम- तुकाराम’च्या नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी सकाळी  अकरा वाजता देहूतील इनामदारवाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. ग्रामस्थांनी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. 

देहू - टाळ- मृदंगांचा गजर आणि ‘तुकाराम- तुकाराम’च्या नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी सकाळी  अकरा वाजता देहूतील इनामदारवाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. ग्रामस्थांनी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. 

गावच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच कमानीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली. वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर केला. माळवाडी येथील ग्रामस्थांनी रांगोळीच्या पायघड्या घालत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शुक्रवारी मुख्य देऊळवाड्यातून देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले होते. पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम देहूतील इनामदारवाड्यातच होता. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता परंपरेनुसार इनामदारवाड्यात शासकीय पूजा झाली.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देसाई आणि पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा व आरती झाली. 

सकाळी अकरा वाजता इनामदारवाड्यातून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. बाजारपेठेत महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे दिंडीप्रमुखांना औषधांच्या किट्‌सचे वाटप करण्यात आले. एमआयटीतर्फेही वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. दुपारी बारा वाजता अनगडशावली बाबा दर्ग्याजवळ पालखीचे आगमन झाले. परंपरेनुसार तिथे आरती झाली. 

माळवाडीतील परंडवाल आणि बिरदवडे कुटुंबीयांकडून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात पालखी ठेवली होती. कुरुळी येथील लोखंडे कुटुंबीयांची बैलजोडी रथास जुंपली आहे. माळवाडी, झेंडेमळा, चिंचोलीत ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली.

रथापुढे २५ व रथामागे २६३ दिंड्या आहेत. मानाच्या अश्‍वांचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती. शिरीषकुमार मित्र मंडळाने अन्नदान केले. रोटरी क्‍लब देहूतर्फे वारकऱ्यांना घोंगटे वाटप केले. माळवाडी येथे जीवनरेखा रुग्णालय आणि रोटरी क्‍लब देहूरोडतर्फे औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dehu pune news sant tukaram maharaj palkhi