तुकोबांच्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 June 2017

पालखीचे आज प्रस्थान; इंद्रायणी काठी टाळ मृदंगांचा गजर

देहू - आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता. १६) दुपारी अडीच वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या आणि वारकरी दाखल झाले आहेत. टाळ-मृदंग आणि तुकोबांच्या नामघोषाने देहूनगरी दुमदुमली असून, पावसाने हजेरी लावल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेला.

सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेले वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत दाखल झाले आहेत. मुख्य देऊळवाड्यात पहाटेपासून वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली. देहू ग्रामपंचायत प्रशासनाने सोहळ्यातील भाविकांना विविध सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून तयारी पूर्ण केली आहे. शासनाच्या वतीने निर्मल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीने चारशे शौचालये देहूत उभारली आहेत. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने विविध ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. 

श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानकरी, सेवेकरीही दाखल झाले. पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या चांदीच्या रथाला पॉलिश करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यातील मानाचे अश्‍व, रथाला जुंपण्यात येणारी बैलजोडी गावात दाखल झाल्याचे पालखी सोहळाप्रमुख अभिजित मोरे, सुनील महाराज मोरे, जालिंदर महाराज मोरे यांनी सांगितले. प्रसाद आणि वारीतील किरकोळ साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये भाविकांची गर्दी होती. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे दहा टॅंकर देहूत उपलब्ध करून दिले आहेत. जीवन प्राधिकरणाकडून चोवीस तास पाणीपुरवठा होईल.

अन्नदानाची सोय 
जिल्हा परिषद आणि हवेली पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी गावात पाहणी केली. वीज वितरण कंपनीचे अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ, इस्कॉन यांच्या भाविकांसाठी अन्नदानाची सोय केली आहे. विविध ठिकाणी पालखी सोहळ्यातील भाविकांना मदत करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dehu pune news sant tukaram maharaj palkhi sohala