तुकोबांच्या पालखीचे उद्या प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 June 2017

संस्थानची तयारी पूर्ण; भाविक देहूत दाखल

देहू - आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता. १६) दुपारी दोन वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल होत असून, त्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामस्थांनी स्वागत कमानी उभारल्या असून, ठिकठिकाणी अन्नदानासाठी मंडपही उभारले आहेत.

संस्थानची तयारी पूर्ण; भाविक देहूत दाखल

देहू - आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता. १६) दुपारी दोन वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल होत असून, त्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामस्थांनी स्वागत कमानी उभारल्या असून, ठिकठिकाणी अन्नदानासाठी मंडपही उभारले आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान दुपारी दोन वाजता मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून होईल. पालखी मार्ग व वैकुंठ गमन स्थान मंदिर मार्ग ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी मारून धुऊन काढला. ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा सज्ज असून भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था केली आहे. सुरक्षिततेसाठी पोलिस तैनात आहेत.

संत तुकाराम महाराज संस्थाननेही पालखी सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. देऊळवाड्यातील भजनी मंडपात शुक्रवारी दुपारी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पादुकांची पूजा होईल. त्यानंतर देऊळवाड्यात पालखी प्रदक्षिणा होऊन पालखी इनामदारवाड्यात मुक्कामी पोचेल. सोहळ्यातील दिंडीप्रमुख व मानकऱ्यांचा सत्कार संस्थानतर्फे केला जाणार आहे, अशी माहिती सोहळाप्रमुख अभिजित मोरे, सुनील दि. मोरे, जालिंदर मोरे यांनी दिली.

पालखी प्रस्थान कार्यक्रम (शुक्रवार, ता. १६ जून)
पहाटे ४.३० : मुख्य देऊळवाड्यात संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात संस्थानच्या विश्‍वस्तांच्या हस्ते महापूजा.
पहाटे ५.३० : श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात महापूजा.
सकाळी ६ : वैकुंठ गमन स्थान मंदिरात महापूजा.
सकाळी ७ : पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात महापूजा. 
सकाळी १० : भजनी मंडपात संभाजी महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन. 
दुपारी १२ : इनामदारवाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यात आणण्यात येतील.
दुपारी २ : देऊळवाड्यातील भजनी मंडपात पालखी सोहळा कार्यक्रमास प्रारंभ व परंपरेनुसार वारीतील ज्येष्ठ वारकऱ्यांच्या हस्ते पादुकांची महापूजा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dehu pune news tukaram maharaj palkhi