कऱ्हेकाठी अनुभवला भावंडांचा जीवनपट

(शब्दांकन - विलास काटे)
Thursday, 22 June 2017

सोहळ्यात आज 
पालखी सोहळा सासवडहून सकाळी सातला निघणार
दुपारचा विसावा शिवरी येथे
सायंकाळी मल्हारनगरी जेजुरीत मुक्काम
तळावर समाज आरती आणि कीर्तन

रोहित दळवी, (बेळगाव, कर्नाटक)
माउलींचा पालखी सोहळा दोन दिवस सासवडला मुक्कामी आहे. आज माउलींचे मोठे बंधू संत निवृत्तिनाथ यांच्या समाधी दिनाचे कीर्तन आणि धाकटे बंधू संत सोपानकाका यांचा पालखी प्रस्थान सोहळा झाला. कऱ्हेकाठी या तिन्ही भावंडांचा जीवनपट भाविकांनी कीर्तन- प्रवचनाच्या माध्यमातून अनुभवला. आजचा दिवस भाविकांसाठी एक प्रकारे आनंदयात्राच होती.

माउलींचा सोहळा मंगळवारी एकादशीला सायंकाळी सासवडमध्ये दाखल झाला. चांदीच्या रथाचा स्टड तुटल्याने भाविकांनी पालखी खांद्यावरून आणली. सुमारे ३२ किलोमीटरचा अवघड टप्पा पार करून पावले थकली होती; मात्र कानांवर पडणारा ‘माउली...माउली...’चा गजर उत्साह वाढवत होता आणि शरीरावर रोमांच उभे राहत होते. रात्री तळावरील समाज आरती आणि कीर्तनाचा आनंद घेतला. तळावर चहुबाजूने व्यायामाचे साहित्य असल्याने भाविक- वारकरी महिला- पुरुष व्यायामाचा आनंद घेत होते. दरम्यान, आज (बुधवारी) द्वादशी असल्याने सासवडवासीयांचा पाहुणचार भाविकांनी चाखला. सकाळपासून पालखीतळावर पंचक्रोशीतील भाविकांची माउलींच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. माउलींच्या दर्शनासाठी प्रत्येक जण आतूर होता. माउलींचे गुरू व मोठे बंधू संत निवृत्तिनाथ महाराजांचा समाधी दिन असल्याने तळावर सकाळीच त्यांच्या जीवनावरील कीर्तन झाले आणि माउलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखी सोहळ्याने सासवडहून पंढरीकडे प्रस्थान ठेवले. वारकऱ्यांना आज तिन्ही भावंडांचा सहवास लाभला. तिन्ही बंधूंचा जीवनपट भाविक वारकऱ्यांच्या हृदयात त्यांच्या बालपणाची आठवण करून देत होता. वारकऱ्यांच्या दृष्टीने ही एक पर्वणीच होती. 

दरम्यान, दुपारनंतर राहुट्यांमधून भजने सुरू झाली. लयबद्ध आणि सांप्रदायिक चाली भजनाच्या माध्यमातून ऐकायला मिळाल्या. मी गेल्या चार वर्षांपासून वारीत सहभागी होत आहे. इतर वारकऱ्यांप्रमाणेच पालखीतळावर गेल्या दोन दिवसांपासून मीही आनंद घेतला. आजचा अनुभव माझ्यासाठी खास होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Palkhi 2017