पावसाची चिंता आता विठूमाउलीलाच

(शब्दांकन - विलास काटे)
Tuesday, 27 June 2017

सोहळ्यात आज 
सकाळचा विसावा विडणी
पिंपरद येथे दुपारच्या जेवणासाठी विसावा
निंबळक फाटा येथे दुपारचा विसावा
बरडला रात्री समाजआरती आणि मुक्काम

सुखदेव गायकवाड, काळेवाडी, ता. दौंड, पुणे
आभाळात ढग दाटून येतात, पाऊस मात्र पडत नाही. पेरण्या केल्या; पण पाऊस नसल्याने चिंता वाटते. दिवसभर दिंडीत चालताना भजनात दंग होतो. सर्व काही विसरायला होते. पण घरून मुलीचा फोन आला आणि पावसाची चिंता वाढली. आता विठूमाउलींच्या संगतीत चालतोय. त्यालाच आमची चिंता...!

आळंदीपासून आभाळात काळे ढग दिसतात. पण जोराचा पाऊस झाला नाही. प्रस्थानादिवशी आळंदीत थोडा पाऊस झाला. त्यानंतर रोज आली तर एखादी हलकीशी सर येते. पण शेतीला उपयोगी पडेल, असा पाऊस नाही. सोमवारी सकाळी तरडगावचा मुक्काम उरकून पहाटे पायी चालू लागलो. माउलींसंगे चालताना थकवा वाटत नाही. आज पाऊस नक्की येणार, अशी आशा होती. मात्र संध्याकाळचे पाच वाजले तरी हवा तसा पाऊस आला नाही. काल उभ्या रिंगणात हलकासा शिडकावा झाला. आज दिवसभरात दिंडीत चालताना आजूबाजूला फलटणजवळ बागायती शेती दिसू लागली आणि तेवढ्यात मुलीचा फोन आला. ‘बाबा पाऊस आहे का?’ ती विचारू लागली. गावाकडे पाऊस नाही आणि इथे वारीतही नाही. तिला तरी काय सांगणार? वारीत बहुतांश वारकरी शेतकरीच. त्यामुळे नामस्मरणाबरोबर पावसाचीही चर्चा विसाव्याच्या ठिकाणी हमखास होते. जो तो चिंतातुर आहे. शेतीत पेरणी केली. पण धान्य उगविण्यासाठी मोठा पाऊस पाहिजेच. आता माउलींसंगे चालताना चिंता नव्हती. विठूमाउली सगळे सुरळीत करेल, या भावनेने वारकरी चालत आहेत. नामस्मरण आणि भजनात मात्र खंड नाही. दिवसभर चालून सायंकाळी फलटणमध्ये आल्यावर शाही स्वागत करण्यात आले. येथील पुरातन राम मंदिराजवळ वारकऱ्यांच्या स्वागतासाठी गर्दी झाली होती. राजेशाही थाटात स्वागताने वारकरी सुखावले. अखेर फलटणच्या प्रशस्त विमानतळावर पालखी सोहळा विसावला. रात्री समाजआरती झाल्यानंतर कीर्तनाचा आनंद भाविकांनी घेतला.

दरम्यान, दिवसभराची थकली पावले अलगध राहुट्यांमधून पहुडली. काही जण थकल्यामुळे झोपी गेले, तर काहींना पाऊस कधी पडणार याची चिंता लागली. मात्र माउली आणि विठूरायावरची श्रद्धा अतूट असल्याने वारकरी ‘घरी गेल्यावर पाहू’ असे म्हणत होते. वारीत आलो आणि 

उजळले भाग्य आतां, 
अवघी चिंता वारली, 

 

असे म्हणत पावसाची चिंता विठ्ठलावरच सोडत होते. तळावर जवळपास असेच वातावरण होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Palkhi 2017