रिंगण, धावा अन्‌ भारुडांचा भक्तिरंग

(शब्दांकन - विलास काटे)
Saturday, 1 July 2017

सोहळ्यात आज 
ठाकूरबुवाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण.
दुपारचा विसावा तोंडले-बोंडले.
पंढरपूर तालुक्‍यात प्रवेश करताना टप्पा येथे सोपानदेव आणि माउलींची बंधुभेट.
भंडी शेगाव मुक्काम.

शांताबाई चौगुले, पाच पंढरी, ता. दापोली, जि. रत्नागिरी
आळंदीपासून चौदा दिवस पायी चालत असताना आजचा दिवस तुलनेत अत्यानंदाचा गेला. कारण माउलीनामात तल्लीन होताना अठरा किलोमीटरचे अंतर कधी गेले कळालेच नाही. त्याचे कारण म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हात माउलींचे रंगलेले रिंगण, दुपारी धावा आणि सायंकाळनंतरच्या भारुडाने मन प्रफुल्लित झाले होते. दिवसभरात देवाचे गुण आळवताना केलेल्या भक्तिरंगाच्या उधळणीने मनाचा थकवा कधीच निघून गेला आणि उरला तो केवळ परमानंद. 

आज खुडूस फाटा येथे सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण होते. रिंगण सकाळी लवकर असल्याने आम्ही लवकरच तयार झालो होतो. सकाळी सहाला माउलींची पालखी निघाली. साधारणतः दोन-अडीच तासांच्या वाटचालीनंतर आम्ही खुडूस फाट्यावर पोचलो. एका शेतामध्ये रिंगणाची आखणी केली होती. पोलिसांचा बंदोबस्त होता. वारकरी आधीपासूनच रिंगण पाहण्यासाठी जागा धरून होते. सोहळा रिंगणाच्या दिशेने सरकत होता. माउलींची पालखी नऊ वाजता रिंगणात मधोमध ठेवली आणि ‘माउली माउली’चा गजर झाला. पताकाधारी दिंड्या, टाळ-मृदंगाचा गजर आणि अश्वांची दौड असा नेत्रदीपक सोहळा आज खुडूस फाट्यावर अनुभवला. 

दुपारच्या जेवणासाठी निमगाव पाटीवर थांबलो. तासाभराची विश्रांती आणि जेवण घेतल्यावर वेळापूरकडे निघालो. वेळापूरच्या माळावर वारकरी धावत होते. महिला-पुरुष सगळे धाव्यावरून ‘माउली-माउली’ करत धावत होते. दिवसभराची मोठी वाटचाल चालूनही धाव्यावर आल्यावर वारकऱ्यांमधला उत्साह कमी नव्हता. मीही धावण्याचा  आनंद घेतला. माउलीनामाने अंगात बळ आले होते. धाव्यावरील पळणारे वारकरी पाहताना ईश्वरभक्तीची वेगळीच मजा 
अनुभवायला मिळाली. 
हेचि दान दे गा देवा,
तुझा विसर न व्हावा,
गुण गाईन आवडी,
हेचि माझी सर्व जोडी,

या अभंगानुसार दिवसभरात माउलीनामाचे गोडवे गायले जात होते. रिंगण सोहळा, धावा आणि माळावरची भारुडं रंगली होती. पन्नास-शंभरच्या गटागटाने भारुडाचा कार्यक्रम सुरू होता. वारीच्या वाटचालीत सर्वांत जास्त भारुडे वेळापूरला दिसली. वेळापूरला पालखी थांबल्यावर शेडगे पंच दिंडीतील जयसिंग मोरे यांच्या वतीने मानाचे भारुड झाले. भारूड पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. भारुडात भाविक दंग झाले. भारुडाचा आनंद घेतल्यानंतर पालखी सोहळा अर्धनारी नटेश्वराच्या वेळापुरात विसावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Palkhi 2017