जेजुरीत पाहिला अबीर-भंडाऱ्याचा संगम

(शब्दांकन - विलास काटे)
Friday, 23 June 2017

सोहळ्यात आज 
उद्या सकाळी पालखी वाल्ह्याकडे रवाना
सकाळी ८.३० वा. दौंडज येथे न्याहरी
दु. १२ वा. वाल्हे येथे मुक्काम
दुपारी समाज आरती

अप्पा बागूल, खडकी,  ता. मालेगाव, जि. नाशिक
जेजुरीचा खंडोबा शैव आणि माउली वैष्णव परंपरेतील असले तरी गुरुवारी जेजुरीत आल्यानंतर दोन्ही देवतांच्या दर्शनाचा दुग्धशर्करा योग घडला. जेजुरीत आल्यावर वारकऱ्यांच्या कपाळी अबिराबरोबरच भंडाराही दिसत होता. एक कुलदैवत आणि एक वैष्णवांचे आद्यगुरू अशा दोन्ही देवतांचे दर्शन झाले. हा क्षण माझ्यासाठी विशेष आनंदाचा होता. 

सकाळी सात वाजता माउलींचा पालखी सोहळा सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ झाला. सासवडवासीयांचा दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन पुढे मार्गस्थ होताना नागरिकांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. शहरातील अरुंद रस्त्यावरून वारकरी शिस्तीत चालत होते. गावकरी दर्शन घेत होते. मधूनच महिला दारासमोर रांगोळ्या काढत होत्या. पालखी सोहळा बोरावके मळा येथे आल्यानंतर हिरव्यागार शेतशिवारांचा आनंद सकाळच्या टप्प्यात वारकऱ्यांनी घेतला. इथल्या वातावरणाने घरापासून लांब आलो आहोत, असे वाटलेच नाही. दुपारी शिवरी येथे विसाव्याला सगळ्यांनी जेवण करून थोडी विश्रांती घेतली. दुपारी चारच्या दरम्यान साकुर्डे फाट्यावर आलो आणि महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या मल्हारगडाचे दुरूनच दर्शन झाले. गडाच्या दर्शनाने ऊर भरून आला. सोहळ्यातील अनेक भाविक खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी करत होते. दुरूनच गडावर वारकऱ्यांची गर्दी दिसून येत होती. मीही दर्शनासाठी गडावर गेलो. पालखी सोहळा सायंकाळी जेजुरीत आल्यानंतर भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करून स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या स्वागताचा उत्साह अमाप होता. सायंकाळी पालखी सोहळा जेजुरीपासून पुढे लोणार समाजाच्या जागेत विसावला. समाजआरती झाल्यानंतर तळावरील कीर्तनासाठी गर्दी झाली. काही वारकरी खंडेरायाच्या दर्शनासाठी गडावर गेले. 

माउलींच्या सोहळ्यात चालल्यामुळे आज वैष्णव आणि शैव अशा दोन देवतांच्या दर्शनाचा लाभ झाला. वर्षातून दोन वाऱ्या खंडेरायाच्या आणि एक पायी वारी माउलींची करतो. खंडेरायाची एक दिवसाची वारी आणि माउलींची वारी अठरा दिवसांची; पण दोघांच्या दर्शनाचा आनंद सारखाच. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी खंडेरायाचे वर्णन केले आहे. आज प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळी अबीरही होता आणि भंडाराही. दोन्हींचा संगम पाहिल्याने कृतार्थ झालो.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Palkhi 2017 jejuri wari 2017