माउली निघाली माहेरी; गहिवरली लोणंदनगरी

माउली निघाली माहेरी; गहिवरली लोणंदनगरी

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचा यावर्षी येथे एकच मुक्काम पडल्याने काल (ता. २४) संध्याकाळपासून येथे माउलींच्या दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली होती. पुरुष व महिलांच्या दीड किलोमीटर अंतरापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कालची संपूर्ण रात्र व आज दुपारपर्यंत गर्दीला पारावारच उरला नव्हता. 

पालखी प्रस्थान ठेवेपर्यंत दर्शनासाठी रांगा सुरूच होत्या. अनेकांना दर्शनाविनाच परतावे लागले. दरम्यान, आज दुपारी एक वाजता पालखी सोहळ्याने तरडगावकडे मुक्कामासाठी प्रस्थान ठेवले. तेव्हा पावसाने हलकासा शिडकाव केला. ग्रामस्थांनी पांढऱ्या टोप्या घालून पालखी खांद्यावरून लोणंद-खंडाळा रस्त्यावर श्री. घाडगे यांच्या क्रांतीविजय हॉटेलसमोर रथात ठेवली. लोणंदकरांनी रस्त्याच्या दुतर्फा जागा मिळेल तेथे उभे राहून व सरहद्देच्या ओढ्यापर्यंत वारीत पायी चालत जावून माउलींना साश्रुनयनांनी हृदयपूर्वक निरोप दिला.

श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात येथे पहिलाच मुक्काम होता. त्या पार्श्वभूमीवर लोणंद नगरपंचायत व प्रशासनाच्या सर्व यंत्रणांकडून पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सर्व ती जय्यत तयारी केली होती. त्यामुळे येथे कोठेही पाणी, स्वच्छता, सुरक्षितता व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. स्वच्छ वारी व निर्मल वारी योजनेंतर्गत पालखी तळावर व शहरात ११ ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांची ७५० युनिट बसवण्यात आली होती. त्याठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करून कर्मचारी व स्वयंसेवकांनी चांगले काम केल्याने यावेळी घाण व दुर्गंधी आटोक्‍यात ठेवण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आले. दरम्यान, शहरात चोहोकडे विसावलेल्या वारकरी दिंड्या व दिंड्यांचे तंबू, टाळ-मृदंगाच्या साथीने कानी पडणारा अखंड हरिनामाचा गजर, दर्शनासाठी अखंडपणे सुरू असलेल्या लांबच लांब रांगा, गर्दीने ओसंडून वाहणारे शहरातील सर्चच रस्ते, जेवणावळी, कीर्तन, प्रवचन तसेच विविध प्रकारच्या सेवा पुरवण्यात मग्न असलेले अनेक हात, व्यवसायिकांची धांदल यामुळे संपूर्ण लोणंदनगरी माउलींच्या भक्तीसागरात बुडून गेली होती.

काल रात्रीपासून आजूबाजूच्या खेडगावांतील तसेच बाहेरच्या राज्य आणि जिल्ह्यातील भाविक येथे एसटी बस, टेम्पो, मोटारगाडी, जीप, मोटारसायकल आदी वाहनांद्वारे मोठ्या संख्येने दाखल होत होते. काल रात्रभर व आज दुपारपर्यंत दर्शनासाठी गर्दी होती. लोखंडी पाइप, बांबूच्या साह्याने महिला-पुरुषांच्या स्वतंत्र प्रत्येकी दोन रांगांचे नियोजन तळावर केले होते. पुरुषांची रांग शास्त्री चौकाकडून तर महिलांची रांग खंडाळा नाक्‍याच्या बाजूकडून सुरू ठेवली होती. दोन्ही बाजूंकडील रांगा एक ते दीड किलोमिटर अंतरापर्यंत अखंडपणे सुरू होत्या. 

वारकरी कमी असल्याचे अंदाज ठरले खोटे
लोणंदमध्ये भाविकांच्या झालेल्या गर्दीने यावर्षी पालखी सोहळ्यासमवेत वारकऱ्यांची संख्या कमी आहे, असे अंदाज वर्तवणारांचे अंदाज खोटे ठरवले आहेत. काल रात्री व आज सकाळी १२ वाजेपर्यंत येथील अनेकांनी दरवर्षीच्या परंपरेनुसार माउलींना बॅण्डच्या गजरात येऊन नैवद्य दाखवले. 

प्रशासनाच्या वतीने सोहळाप्रमुखांचा सत्कार
प्रशासनाच्या वतीने खंडाळ्याचे तहसीलदार शिवाजीराव तळपे, नगरपंचायतीच्या वतीने स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील यांनी पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्तांना आज सकाळी पालखीतळावर जावून श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला. विश्वस्तांच्या वतीनेही महसूल विभाग, लोणंद नगरपंचायत, पोलिस व अन्य यंत्रणांचा श्रीफळ देऊन सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com