उभे रिंगण, उडीच्या खेळांनी हरपले देहभान

(शब्दांकन - विलास काटे)
Monday, 26 June 2017

भागूबाई शंकर राठोड,गेवराई, जि. बीड
वारीच्या वाटेवरील उभे रिंगण आणि रिंगणानंतरचे उडीचे खेळ आमच्यासाठी विशेष होते. देहभान हरपून भगव्या पताका उंचावणारे आणि अभंग गाणारे वारकरी... त्यांच्यात तितक्‍याच तन्मयतेने सहभागी होत आम्हीही ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ या अभंगाप्रमाणे आज रिंगणातील आनंदाचा क्षण अनुभवला. 

भागूबाई शंकर राठोड,गेवराई, जि. बीड
वारीच्या वाटेवरील उभे रिंगण आणि रिंगणानंतरचे उडीचे खेळ आमच्यासाठी विशेष होते. देहभान हरपून भगव्या पताका उंचावणारे आणि अभंग गाणारे वारकरी... त्यांच्यात तितक्‍याच तन्मयतेने सहभागी होत आम्हीही ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ या अभंगाप्रमाणे आज रिंगणातील आनंदाचा क्षण अनुभवला. 

गेली सात वर्षे मी वारी करते. आम्ही सर्व जण लमाण तांड्यातील. आई-वडिलांमुळे वारीविषयी आवड निर्माण झाली. आळंदीपासून वारीचा आनंद घेतो. सुरवातीला आमचे कपडे आणि त्यावरील आरसे, आमच्या वेशभूषेबरोबरच केसांची रचना पाहून वारीतील लोक आमच्याकडे ‘आदिवासी’ या नजरेने पाहायचे; मात्र लमाण तांड्यातील असलो तरी आम्ही बीडसारख्या भागात राहत आहोत. वारीतील अभंग आमचेही पाठ आहेत. लोक आमच्याकडे कुतुहलाने पाहायचे. वारीत अनेकांशी मैत्री झाली. 

रविवारी सकाळी लोणंद पालखी तळावरील पहाटपूजेपासून रिंगणापर्यंतचा प्रवास सुखकर होता. ऊन-पावसाच्या खेळात रिंगणाचा आनंद घेतला. दुपारच्या जेवणानंतर एक वाजता माउलींचा सोहळा लोणंदमधील मुक्काम हलवून पहिल्या उभ्या रिंगणासाठी चालू लागला. चांदोबाचा लिंब येथे आल्यावर उत्कंठा वाढली. माउलींचा रथ जसाजसा रिंगणाच्या जागेवर येऊ लागला, तसतसा वारकऱ्यांनी ‘माउली.. माउली...’चा गजर केला. वारकऱ्यांबरोबर बघ्यांची गर्दी अधिक झाल्याने मानकऱ्यांनी रिंगणाची जागा बदलली. शंभर-दोनशे मीटर पुढे रिंगण सुरू केले. रिंगणासाठी चोपदारांनी दिंड्यांच्या उभ्या ओळी केल्या. रथापुढील सत्तावीस आणि रथामागील वीस दिंड्यांतील वारकरी रिंगणात टाळ-मृदंग वादनात दंग होते. मागील काही दिंड्या रिंगणासाठी ओळी करून घेत होत्या. रिंगणासाठी रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. एवढ्यात माउलींच्या अश्वाने रिंगणासाठी धाव घेतली आणि माऊलीनामाचा गजर झाला. अश्वाने रिंगण पूर्ण केल्यावर उडीच्या खेळाला सुरवात झाली. वारकरी देहभान हरपून खेळ खेळत होते. रिंगणाचा हा अनुपम सोहळा डोळ्यांत साठवून आम्ही तरडगावच्या दिशेने मार्गस्थ झालो.

वारीच्या वाटेवर हरिनामात दंग असलो तरी स्वच्छता, आरोग्याबरोबरच ‘मुलगी वाचवा’चा संदेशही आम्ही आमच्या लमाणी भाषेत देत आहोत. बरोबरचे भाविक आमच्या गाण्याचा आनंद घेतात. वारकऱ्यांचे अभंग आणि खेळाने देहभान हरपते.

सोहळ्यात आज 
काळज, सुरवडी, निंभोरे ओढा, वडजलमार्गे फलटण
फलटणकरांकडून शाही स्वागत
गुलाबपाणी आणि अत्तराचे शिंपण
विमानतळावर समाजआरती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dnyaneshwar-palkhi-2017 pandharichi wari