चांदोबाचा लिंब येथे रंगले रिंगण

व्यंकटेश देशपांडे 
Monday, 26 June 2017

फलटण - मुखात विठोबा-माउलींचे नाम आणि टाळ-मृदंगांचा टिपेला पोचलेला गजर अशा चैतन्यमय वातावरणात आज संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीमार्गावर चांदोबाचा लिंब येथे पहिल्या उभ्या रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा झाला. सोहळ्याच्या अग्रभागातून दौडत आलेले दोन अश्‍व पाहताना हजारो वारकरी आपले भान हरपले. अनेकांनी रिंगण मार्गावरील धूळ आपल्या मस्तकी लावून विठूनामाचा गजर केला. 

फलटण - मुखात विठोबा-माउलींचे नाम आणि टाळ-मृदंगांचा टिपेला पोचलेला गजर अशा चैतन्यमय वातावरणात आज संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीमार्गावर चांदोबाचा लिंब येथे पहिल्या उभ्या रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा झाला. सोहळ्याच्या अग्रभागातून दौडत आलेले दोन अश्‍व पाहताना हजारो वारकरी आपले भान हरपले. अनेकांनी रिंगण मार्गावरील धूळ आपल्या मस्तकी लावून विठूनामाचा गजर केला. 

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा आपला लोणंदमधील दीड दिवसाचा मुक्‍काम संपवून तरडगावकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी दुपारी साडेबारा वाजता विधिवत नैवद्य दाखवून माध्यान्ह आरती झाली आणि सोहळा उभ्या रिंगणासाठी चांदोबाच्या लिंबकडे निघाला. हजारो लोणंदकरांनी पालखीला सरहद्द ओढ्यापर्यंत येऊन निरोप दिला. सोहळा माउलींच्या गजरात दुपारी ३.५० वाजता चांदोबाचा लिंब येथे पोचला.

वारीतील पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी परिसरातील पुणे, सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर भागातून आलेले भाविक रस्त्याच्या दुतर्फा जागा मिळेल तिथे गर्दी करून उभे होते. दुपारी चार वाजता सोहळ्यातील राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार यांनी सोहळ्याच्या अग्रभागापासून पालखीच्या रथापर्यंत रिंगण लावून घेतले. भाविकांमध्ये असलेली उत्सुकता आणि सोहळ्यात सहभागी झालेले वैष्णव यांच्या चेहऱ्यावरील आनंद या वेळी ओसंडून वाहताना दिसला. रिंगण लावून झाल्यानंतर काही क्षणांतच सोहळ्याच्या अग्रभागातून दौडत आलेले अश्‍व पाहताना माउलींच्या झालेल्या गजराने आसंमत दणाणून गेला. सर्वांच्या नजरा त्या धावत येणाऱ्या अश्‍वांकडे खिळून राहिल्या होत्या. टाळ-मृदंगाचा टिपेला पोचलेला आवाज, जोडीला माउलींचा गजर आणि उंचावल्या गेलेल्या हातातील पताका असे दृश्‍य भाविकांनी डोळ्यांत साठवले. 

ढगाळ वातावरणामध्ये उभे राहून भाविकांनी पहिल्या उभ्या रिंगणाचा आनंद अनुभवला. दौडत आलेले अश्‍व पालखी रथाजवळ आल्याबरोबर पालखी सोहळ्याच्या वतीने गूळ आणि हरभऱ्याची डाळ असा खुराक अश्‍वांना देण्यात आला. त्यांच्या गळ्यात हार घातले आणि पुन्हा अश्‍व दौडतच अग्रभागी गेले. उभ्या रिंगणाचा सोहळा पार पडल्यानंतर चोपदाराने रथावर उभे राहून दंड फिरविला आणि सोहळा पुढे मार्गस्थ झाला. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने मिळेल त्या वाहनाने रिंगण सोहळा पाहण्यासाठी आले होते. उभे रिंगण पार पडल्यानंतर सोहळा हळुवारपणे माउलींचा गजर करीत विठ्ठलाच्या ओढीने पुढील मुक्‍कामी तरडगावकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी पाच वाजता वैष्णवांचा मेळा तरडगावच्या प्रवेशद्वारावर येऊन पोचला.

जागा बदलल्याने अनेकांची निराशा
चांदोबाचा लिंब येथे होणारे पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी परिसरातील गावांतून अनेक भाविक सहभागी होत असतात. यंदा मात्र, उभे रिंगण नेहमीच्या जागी न झाल्याने सोहळ्यातील वारकऱ्यांसह उपस्थित अनेक भाविकांना ते पाहता आले नाही. इतक्‍या लांब येऊन रिंगण पाहता आले नाही, अशी खंत अनेकांनी बोलून दाखविली. काही अंतरावर पुढे झालेल्या रिंगणाची छायाचित्रे प्रसारमाध्यमांना योग्य प्रकारे मिळू शकली नाहीत. नेहमीच्या जागेवर लावलेले कॅमेरे गडबडीने पुढे नेता आले नाहीत. पुढे काही अंतरावर रिंगण झाल्याने सोहळा पाहण्याच्या दृष्टीने भाविकांची पळापळ झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dnyaneshwar-palkhi-2017 phaltan ringan