esakal | "निसर्ग आणि अध्यात्माचे सुरेख चित्रण' 
sakal

बोलून बातमी शोधा

"निसर्ग आणि अध्यात्माचे सुरेख चित्रण' 

"निसर्ग आणि अध्यात्माचे सुरेख चित्रण' 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सासवड - ""संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवे घाटात आल्यानंतर निसर्ग आणि अध्यात्माचे एकत्रित चित्रण करण्यात आनंद वेगळाच आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्गाचे संतुलन वर्षानुवर्षे जपण्याचा संदेश वारीत मिळतो,'' अशी भावना कोल्हापूरच्या शुभम बोंगाळे याने मंगळवारी व्यक्त केली. 

पुण्यातील खासगी महाविद्यालयात मागील वर्षी छायाचित्रणाचा अभ्यासक्रम करत असताना छायाचित्रे काढण्यासाठी शुभम वारीत दाखल झाला. यंदा त्याचे दुसरे वर्ष आहे. दिवे घाटात अनेक जण छायाचित्रणासाठी येतात. गेल्या वर्षी वारीत सुखद अनुभव आल्याने मित्रांबरोबर तो आळंदीपासून कॅमेरा घेऊन आला आहे. ""वारीत डोक्‍यावर तुळस घेऊन चालणाऱ्या महिला, भगव्या पताका उंचावणारे वारकरी, टाळमृदंगाच्या नादात लयबद्ध चालणारे वारकरी, घाटातील चढ चढण्यासाठी रथाला जोडण्यात आलेली जादाची बैलजोडी आणि मागे पळणारे कार्यकर्ते टिपताना धावपळ होते. दिवे घाटातील हिरवाईचे चित्रण करताना नेमकेपणा टिपतो. वारीत छायाचित्रण करताना वारकऱ्यांचा भाव आणि श्रद्धा बरेच काही शिकवून जाते. निष्ठेने चालणाऱ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर माउलींबरोबर चालण्याचा वेगळाच आनंद दिसतो. एवढे अंतर चालूनही त्यांना थकवा जाणवत नाही, तसाच मलाही...'' असे शुभम म्हणाला. 

""आजच्या वाटचालीत सकाळपासून उकाडा होता. ऊन तीव्र होते. दुपारी दोननंतर घाटात अधूनमधून ढग होते. घाट चढताना अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाही उत्साह कमी होत नव्हता. दिवे घाटात छायाचित्र काढण्याचा मोह प्रत्येकाला होतो. मीही चांगली जागा शोधून छायाचित्र काढत होतो. सेल्फीसाठी तरुणांबरोबरच वयस्कर मंडळींही पुढे होती. तरुणाईची संख्या अधिक होती. वृद्धांबरोबर तरुण आणि ग्रामीण भागातील लोकांबरोबर शहरी भागातील वारकरी बहुसंख्येने वाढत असल्याचे दिसून आले. वारीत माउलींबरोबर चालताना विठ्ठलावरची श्रद्धा वाढत असल्याने भाविकांची संख्या वाढली आहे,'' असे निरीक्षण शुभमने नोंदविले. 

वारीत तरुणांची संख्या वाढली; मात्र तरुणांनी श्रद्धा निष्ठेने पाळलीच पाहिजे, दंगा नको. वाटचालीत अनेक तरुण हुल्लडबाजी करत होते. निष्ठेने जोपासलेली वारी संस्कृती समजून जपली पाहिजे, असे तो म्हणाला. 

पालखी सोहळ्यात आज 
- सासवडमधील मुक्कामाचा दुसरा दिवस 
- संत सोपानदेव पालखी प्रस्थान 
- द्वादशी भोजन 
- पालखीतळावर कीर्तन, प्रवचन.