‘माउली’नामात अनुभवला प्रेमभाव

(शब्दांकन - विलास काटे)
Saturday, 24 June 2017

सोहळ्यात आज 
माउलींचा पालखी सोहळा सकाळी साडेसहाला मार्गस्थ
नीरा नदीवर दुपारी माउलींच्या पादुकांना नीरास्नान
त्यानंतर पाडेगाव येथे सातारा जिल्ह्यात पालखीचा प्रवेश
लोणंद येथे रात्रीचा मुक्काम

माउली म्हणजेच आई. वारीत प्रत्येक जण एकमेकांना माउली म्हणतो. माउलीनामामध्ये प्रेमभाव दडला आहे. वारीच्या वाटेवर प्रत्येक वारकरी माउलीनामाच्या मोहात अडकल्याने समाजात खऱ्या अर्थाने प्रेमभाव वाढीस लागल्याची खात्री वारीत चालताना मला जाणवली. 

दिल्लीत असताना आळंदीतील काही महिला कुंभमेळ्यासाठी अलाहाबादला जाण्याकरिता तेथे आल्या होत्या. त्यापैकी शोभा नावाच्या साधक महिलेकडून माउली, विठ्ठल आणि पंढरीच्या वारीबाबतची महती ऐकली. ‘यंदा वारी करायचीच,’ असे मनोमन ठरविले. आळंदी ते वाल्हे दरम्यानचा टप्पा पार केला, थकवा वाटला नाही, ऊर्जा मात्र मिळाली. रोज नवीन अनुभव आले. रोज रात्री पालखीतळावर समाज आरती होते. आज मात्र दुपारीच समाज आरती झाली. या वेळी चक्राकार उभ्या राहिलेल्या दिंड्या, चोपदारांनी चोप उंचावताच होणारी शांतता आणि त्यानंतर होणारी माउली, तुकाराम महाराजांची आरती हे सर्व मी पाहात होतो. माझ्यासाठी हा अनुभव आत्मानुभूती देणारा होता. वारीच्या वाटचालीत वेगवेगळ्या दिंड्या समूहाने चालतात. मात्र, सगळे ओळीत चालतात. शिस्तीला येथे फार महत्त्व आहे. माउलींच्या गजराने आध्यात्मिक वातावरणाचा आनंद मिळाला. 

वारीत चालताना सुरवातीला देशपांडे नावाच्या वारकऱ्याने भजनी मालिका हातात दिली. मराठीचा गंध नाही. मात्र, सुरवातीचे अभंग त्यांनी म्हणून दाखविले. कानावर पडणारा भजनाचा ठेका मला आपोआप मराठीतील अभंगांची चाल शिकवून गेला. गोडी लागल्यावर मी टाळ मागवून घेतले. आता चालताना भजन, टाळ- मृदंगांच्या तालात तल्लीन होतो. 

जेजुरीतील मुक्काम पार केल्यावर आजचा प्रवास छोटा होता. वारीच्या वाटेवर मोठ्या प्रमाणावर अन्नदान होते. बरोबर चालणारे लोक माझ्यासारखेच विविध प्रांतांतून आलेले; मात्र विठ्ठलाचे गोडवे गाताना भाषेची अडचण येत नव्हती. माउली.. माउली... केवळ भगवंताचे नाव नाही, तर वारीत सगळेच माउली आहे. आईचे प्रेम घरात जसे मिळते, तसाच प्रेमभाव वारीत आल्यावर मिळतो. मी हिंदी भाषक; पण बरोबर चालणाऱ्या वारकऱ्यांच्या मुखातून निघणारे अभंग आणि माउलीनामाच्या गजराने वारीची गोडी पहिल्याच दिवशी लागली. आळंदी ते पंढरपूर वारी पूर्ण करणार. परतताना माउली आणि विठ्ठल या दोन नामांची शिदोरी बरोबर घेऊन जाणार आहे. हे दोन शब्दच जीवनाचे अध्यात्म असून, परमसुखाच्या दारी पोचविणारी पंढरीची वारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Palkhi 2017 wari 2017