esakal | ‘विठुरायाची ओढ देते चालण्याचे बळ’
sakal

बोलून बातमी शोधा

‘विठुरायाची ओढ देते चालण्याचे बळ’

‘विठुरायाची ओढ देते चालण्याचे बळ’

sakal_logo
By
सचिन शिंदे

लोणी काळभोर - ‘वारी म्हणजे जगण्याची श्रद्धा आणि सकारात्मक विचारांना ताकद देणारी भक्ती आहे. अवघ्या जगाला दिशा दाखवणाऱ्या पांडुरंगाला भेटायची ओढच मार्गावर चालण्याचे बळ देते...’ वारीचे दशक पूर्ण करणारे अवघ्या तिशीतील वासुदेवाच्या रूपातील वारकरी ‘सकाळ’शी बोलत होते. दिगंबर कानडे व लक्ष्मण हांडे अशी त्यांची नावे. यवतमाळ जिल्ह्यातील वडुळ त्यांचे मूळ गाव.  

मराठवाडा, विदर्भात वासुदेव समाज मोठ्या प्रमाणात आहे. पिढ्यान्‌ पिढ्या वारीचीही परंपरा त्यांच्या सोबत आहे, असेही ते आवर्जून सांगतात. पुण्यातील निवडुंग्या विठुरायाच्या मंदिरातून मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. सुमारे वीस किलोमीटरच्या अखंड प्रवासानंतर सायंकाळी सोहळा लोणी काळभोरमध्ये विसावला. त्या वेळी दिवसभरातील वाटचालीत लोकांचे आकर्षण ठरलेल्या वासुदेवाच्या रूपातील वारकऱ्यांशी संवाद साधला. वासुदेवाच्या रूपाला वारकरी सांप्रदायात विशेष महत्त्व आहे. मराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रातूनही वासुदेव पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. 

सावळ्या पांडुरंगाच्या भेटीला निघालेला वारकरी प्रत्येक दिवशी नव्या उमेदीने वेगळ्या विचारात चालतो, असे दिगंबर कानडे सांगत होता. तो म्हणाला, ‘‘वासुदेव समाजाचे काम लोकांना चांगल्या गोष्टी सांगण्याचे आहे. सुमारे चारशेपेक्षा जास्त वासुदेव दोन्ही पालखी सोहळ्यांत आहेत.

त्यांच्याकडून नेहमीच देवाची आळवणीच केली जाते. वासुदेवाची परंपरा सांभाळत आम्ही इतरवेळी पडेल ते काम करतो. मात्र आषाढी वारी चुकवत नाही. वारीच्या वाटचालीत विठुरायाच्या अखंड गजराने सार्थ वाटते. वारीत असले की वीस दिवस कशाचीही आठवण येत नाही. आता हीच परंपरा आम्ही पुढच्या पिढीलाही दिली आहे. त्यामुळे विठुरायाची ओढ तुकोबांसारखीच आम्हालाही बळ देते.’’

सोहळ्यात आज 
पालखी सोहळा सकाळी लोणी काळभोरमधून होणार मार्गस्थ
पहिली विश्रांती कुंजीरवाडी फाटा येथे
उरुळी कांचन येथे दुपारची विश्रांती 
जावजीबुवाची वाडी येथे सायंकाळची विश्रांती 
सायंकाळी सोहळा यवत मुक्कामी पोचणार