आषाढी वारीसाठी कडेकोट बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 2 July 2017

नेहमीपेक्षा यंदा वाहतूक पोलिसांची संख्या वाढविली

पंढरपूर: आषाढी यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्‍यक ती सर्व दक्षता घेण्यात येत आहे. यंदा नेहमीपेक्षा वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

नेहमीपेक्षा यंदा वाहतूक पोलिसांची संख्या वाढविली

पंढरपूर: आषाढी यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्‍यक ती सर्व दक्षता घेण्यात येत आहे. यंदा नेहमीपेक्षा वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

ते म्हणाले, ""आषाढी यात्रेसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. दक्षता म्हणून यात्राकालावधीत बॉंबशोधक पथक, तसेच श्‍वानपथकासह विशेष पथकेही तैनात केली जाणार आहेत. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे, त्यामुळे यात्राकाळात वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांचे विशेष पथक, गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी सीसीटीव्ही व आवश्‍यक ठिकाणी प्रखर प्रकाशाची व्यवस्था केली जात आहे. यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी एक पोलिस अधीक्षक, सात अप्पर पोलिस अधीक्षकांसह पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, महिला पोलिस उपनिरीक्षक, पोलिस व महिला पोलिस कर्मचारी, राखीव पोलिस दलाचे कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत. याशिवाय वाहतूक शाखेसाठी तीन पोलिस उपअधीक्षक, दहा पोलिस निरीक्षकांसह पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर "एसआरपीएफ'च्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.''
शहरातील सर्व गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर परिसर, वाळवंट, दर्शन रांग यासह शहरातील प्रमुख गर्दीच्या भागांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे, त्यासाठी श्री विठ्ठलमंदिर तसेच संत तुकाराम भवन येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

वारकऱ्यांच्या वेशात महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी अहोरात्र फिरून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्षता घेणार आहेत. विविध जिल्ह्यांतील खिसेकापू व भुरट्या चोरांना ओळखणारे गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यात्राकाळात शहरात सर्वत्र फिरून अशा गुन्हेगारांना पकडून चोरीच्या घटना घडू नयेत याची काळजी घेणार आहेत.

अशी असेल सुरक्षा
पोलिस अधीक्षक एक, अप्पर पोलिस अधीक्षक सात, उपअधीक्षक 14, पोलिस निरीक्षक 59, पोलिस उपनिरीक्षक 203, महिला फौजदार 27, पोलिस कर्मचारी तीन हजार 215, वाहतूक पोलिस उपअधीक्षक तीन, वाहतूक पोलिस निरीक्षक 10, वाहतूक पोलिस उपनिरीक्षक 25, वाहतूक पोलिस 420, राखीव पोलिस दल तीन तुकड्या, पुरुष होमगार्ड एक हजार 400, महिला होमगार्ड 200, वारकरी पथक 10.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pandharpur news wari ashadhi yatra and poice